बिहारमध्ये सत्ता भाजपा-नितीशकुमार यांचीच ; ‘मिटसॉग’च्या अभ्यासातील निष्कर्ष - BJP-Nitish Kumar will come to power in Bihar concludes MIT School of Government | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमध्ये सत्ता भाजपा-नितीशकुमार यांचीच ; ‘मिटसॉग’च्या अभ्यासातील निष्कर्ष

उमेश घोंगडे  
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

बिहारमध्ये सत्ता भाजपा-नितीशकुमार यांचीच येईल, असे निरीक्षण पुण्यातल्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) या राजकीय अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयाने मांडले आहे.

पुणे : बिहार निवडणुकीत साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीतून सत्ता कुणाची येणार याचा अभ्यास आता मांडला जाऊ लागला आहे. बिहारमध्ये सत्ता भाजपा-नितीशकुमार यांचीच येईल. मात्र निसटत्या बहुमताने, असे निरीक्षण पुण्यातल्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) या राजकीय अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयाने मांडले आहे.

या निवडणुकीत खरी चुरस भारतीय जनता पार्टी व राष्ट्रीय जनता दल यांच्यात असून चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाचा फटका नितीशकुमार यांना बसण्याची शक्यता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांविरोधातील नाराजीचा फटका भाजपाला नव्हे तर नितीशकुमार यांना बसण्याची शक्यता असून त्यांच्या जागा गेल्यावेळीपेक्षा कमी होणयाची शक्यता असल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.

एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट या संस्थेचे वरिष्ठ संचालक रवींद्रनाथ पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांचा १५ जणांचा गट सध्या बिहार निवडणुकीच्या अभ्यासासाठी बिहारमध्ये आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान त्यांनी ही निरीक्षणे नोंदवली आहेत. राज्यभराचा दौरा केल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मतदारांना भेटून तसेच तेथील एकुण परिस्थितीच्या केलेल्या अभ्यासातून ही निरीक्षणे मांडण्यात आली आहेत. 

या संदर्भात बोलताना वरिष्ठ संचालक पाटील म्हणाले, ‘‘ बिहारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार व भारतीय जनता पार्टीची युती आहे. लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान स्वतंत्रपणे लढत आहेत तर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेतृत्व त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्याकडे आहे.

लालूप्रसाद यादव सध्या तुरूंगात आहेत. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाचे नेतृत्व तेजस्वी यांच्याकडे आहे. भाजपा व नितीशकुमार विरूद्ध तेजस्वी व चिराग अशी बिहारची निवडणूक रंगात आहे. या निवडणुकीत ‘एमआयएम’मुळे विभागणी होणाऱ्या मुस्लीम मतांचा फटका कॉंग्रेस व काही प्रमाणात तेजस्वी यादव यांना बसण्याची शक्यता आहे. 

चिराग यांच्या लोक जनशक्ती पक्षाचा फटका नितीशकुमार यांना बसेल. मतदानाचा अंदाज घेतला असता या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल व भारतीय जनता पार्टी हे दोन पक्ष म्हणून फायद्यात राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजपा व नितीशकुमार मिळून पुन्हा एकदा ‘एनडीए’चे संयुक्त सरकार स्थापन करण्याची शक्यता अधिक असली तरी नितीशकुमार यांच्या जागा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

तेजस्वी यादव यांना ‘एमआयएम’मुळे फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली तरी गेल्यावेळची आमदारांची संख्या ते निश्‍चितपणे कायम राखतील. कदाचित त्यात काही प्रमाणात वाढदेखील होऊ शकते, असे त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादावून दिसत आहे.’’

काही निरीक्षणे

* नितीशकुमार सरकारविरोधात सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील नाराजी (अॅन्टी इन्कम्बन्सी) मात्र, केंद्र सरकारबाबत नाराजीचा सूर तुलनेने कमी.
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यंची लोकप्रियता कायम.
* कॉंग्रेस केवळ ‘आरजेडी’च्या पारंपरिक मतांच्या भरवशावर.
* आरजेडीचे यश मर्यादीत ठेवण्यात ‘एमआयएम’चा सहभाग राहील.(मुस्लीम मतदान विभागले जाईल)
* खरी लढत आरजेडी विरूद्ध भाजपा अशीच.
* नितीशकुमार यांची ताकद कमी होण्याची शक्यता, मात्र, निसटत्या बहुमताने ‘एनडीए’ सत्तेत.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख