शेतकऱ्यांची भाजप आमदाराला निर्वस्त्र करून मारहाण...व्हिडिओ व्हायरल - BJP MLA stripped and beaten by farmers in punjab | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांची भाजप आमदाराला निर्वस्त्र करून मारहाण...व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
रविवार, 28 मार्च 2021

पोलिसांनी या आमदाराला शेतकऱ्यांच्या तावडीतून सोडवत सुरक्षित ठिकाणी नेले.

चंदीगड : मागील काही महिन्यांपासून केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. पंजाब व हरयाणासह उत्तर प्रदेशातील काही भागातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यातच संतप्त शेतकऱ्यांनी भाजपच्या एका आमदाराला निर्वस्त्र करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या आमदाराला शेतकऱ्यांच्या तावडीतून सोडवत सुरक्षित ठिकाणी नेले.

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे आमदार अरूण नारंग यांना मारहाण झाली आहे. नारंग हे काल मुक्तसर जिल्ह्यातील मलोट येथे गेले होते. तिथे स्थानिक नेत्यांसोबत ते एक पत्रकार परिषदेत घेणार होते. त्याचवेळी शेतकऱ्यांच्या एका गटाने त्यांना अचानक घेराव घातला. त्यांच्यावर व त्यांच्या वाहनांवर शाई फेकण्यात आली. त्यामुळे पोलिस नारंग यांना घेऊन जवळच्याच एका दुकानात गेले.

काही वेळाने नारंग बाहेर आले तेव्हा संतापलेल्या शेतकऱ्यांनी नारंग यांच्यावर हल्ला केला. त्यांचे कपडे फाडून मारहाण कऱण्यात आली. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांपासून नारंग यांचा बचाव करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. त्यांना  या गर्दीतून बाहेर काढत सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना नारंग म्हणाले, माझे कपडे फाडून मारहाण करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांत तक्रात देण्यासंदर्भात पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली जाईल, असे नारंग यांनी सांगितले. या प्रकारानंतर मलोट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या घटनेचा निषेध केला आहे. शेतकऱ्यांनी अशा हिंतात्मक घटनांमध्ये सहभागी होऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कृषी कायद्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून लवकर मार्ग काढावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच त्यांनी नारंग यांच्यावर हल्ला करण्यांविरूध्द कठोर कारवाई करण्याचे आदेशही पोलिसांना दिले आहेत. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख