मुख्यमंत्र्यांनी शब्द खरा करून दाखवला; भाजपचं खातं बंद केलं

केरळ विधानसभा निवडणुकीचा कालऐतिहासिक निकाल लागला आहे. डाव्यांनी चाळीस वर्षांचा इतिहास मोडून काढला आहे.
BJP loss even single seat in kerala assembly election
BJP loss even single seat in kerala assembly election

तिरूअनंतपुरम : केरळ विधानसभा निवडणुकीचा काल ऐतिहासिक निकाल लागला आहे. डाव्यांनी चाळीस वर्षांचा इतिहास मोडून काढला आहे. केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्तापालट होतो. पण यावेळी मुख्यमंत्री पी. विजयन यांचा करिष्मा पाहायला मिळाला. डाव्या आघाडीने 97 जागा जिंकत काँग्रेस आघाडीला धुळ चारली. तर भाजपला मागील वेळची एक जागाही राखता आली नाही.

मागील विधानसभा निवडणूकीत भाजपला एक जागा मिळाली होती. याचा संदर्भ देत मुख्यमंत्री विजयन यांनी या निवडणुकीत भाजपचे खाते बंद करू, असे आव्हान दिले होते. त्याप्रमाणे भाजपला या निवडणुकीत एकाही मतदारसंघात विजय मिळवता आला नाही. भाजपने यावेळची केरळ विधानसभा निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी केरळचे दौरे केले. प्रचार सभा, रोड शो घेत केरळमधील राजकीय वातावरण ढवळून काढले. मेट्रोमॅन म्हणून प्रसिध्द असलेल्या 88 वर्षांच्या ई. श्रीधरन यांना पक्षात प्रवेश दिला. त्यांचा चेहरा पुढे करून भाजपने ही निवडणूक लढवली. भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांनी श्रीधरन हे भाजपकडून मुख्यमंत्री असतील, अशी घोषणाही करून टाकली होती.

पण काल निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागल्यानंतर भाजपच्या पदरी निराशा पडली. ई. श्रीधरन पलक्कड मतदारसंघातून विजयी होतील, अशी अपेक्षा भाजपला होती. त्यांनी अखेरच्या फेरीपर्यंत लढत दिली. पण 3 हजार 859 मतांनी त्यांचा पराभव झाला. श्रीधरन यांनी मुख्यमंत्री पदाशिवाय ध्येय पूर्ण करता येणार नाहीत, असे वक्तव्यही सुरूवातीला केले होते. पण त्यांच्यासह भाजपही विजयापासून दूर राहिले. 

भाजपने 2016 मध्ये नेमॅान मतदारसंघातून विजय मिळवला होता. पण यावेळी हा मतदारसंघही हातातून निसटला. मागील निवडणूकीत भाजप सात मतदारसंघात दुसऱ्या स्थानावर होते. यावेळी केवळ पाच मतदारसंघात भाजपने चांगली लढत दिली. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी कोन्नी आणि मंजेश्वर या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण दोन्ही ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 

निवडणूक प्रचारादरम्यान भाजपकडून सबरीमाला मंदीर प्रवेशाच्या मुद्यावरून सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यासह हिंदु मतदारांना वळविण्यासाठी त्यांनी जोर लावला होता. पण त्याचा परिणाम मतदानावर झाला नाही. भाजपला केवळ 11 टक्के मते मिळाली असून 2019 च्या लोकसभेतील मतांपेक्षा ही टक्केवारी कमी आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com