भाजपचे नेते ज्योतिरादीत्य शिंदे म्हणाले, "काँग्रेसला मत द्या.." - BJP leaders Jyotiraditya Shinde forgot his party he demanded votes for Congress | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे नेते ज्योतिरादीत्य शिंदे म्हणाले, "काँग्रेसला मत द्या.."

सरकारनामा ब्युरो
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

एका जाहीरसभेत ज्योतिरादित्य शिंदे हे आपला पक्षच विसरले... मतदारांकडे त्यांनी चक्क काँग्रेससाठीच मतांची मागणी केली.  त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ग्वाल्हेर : विधानसभेच्या 28 जागांसाठी मध्यप्रदेशात पोटनिवडणुक होत आहे. आरोप-प्रत्यारोपांमुळे मध्यप्रदेशातील राजकीय वातावरण सध्या तापले आहे. अनेक नेत्यांच्या प्रचार सभा आणि रॅलीचे आयोजन केलं जात आहे. कार्यक्रते, नेत्यांची सर्वत्र  लगभग दिसत आहे.  काँग्रेस, भाजपा आणि इतर अनेक पक्ष आपापल्या उमेदरवारासाठी प्रचार करत आहेत.

भाजपचे नेते, राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे हेदेखील या निवडणुकीत प्रचार करत आहेत. काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपच्या गोटात शिरलेले ज्योतिरादित्य शिंदे हेदेखील निवडणुकीचे मैदान गाजवित आहेत. एका जाहीरसभेत ज्योतिरादित्य शिंदे हे आपला पक्षच विसरले... मतदारांकडे त्यांनी चक्क काँग्रेससाठीच मतांची मागणी केली.  त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विरोधकांनी शिंदे यांच्यावर टीका करीत त्यांना चिमटे काढले आहेत.
   
ग्वाल्हेर जिल्ह्यातील डबरा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. येथील जाहीर सभेत हा प्रकार घडला. भाजपा उमेदवार इमरती देवी यांच्यासाठी ज्योतिरादीत्य शिंदे हे प्रचार करत होते. या प्रचारावेळी सभेत बोलताना शेवटी मतदारांना आवाहन करताना त्यांनी हाताच्या पंजाला मत द्या, असं म्हटलं आणि सभेत उपस्थित लोकांकडून एकच हशा पिकला.

"आपण नक्की कोणत्या पक्षात आहोत, याबद्दल आपले छोटे महाराज थोडेसे गोंधळलेले आहेत", असं म्हणत सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनीही ज्योतिरादित्य शिंदे यांना चिमटा काढलाय. प्रशांत भूषण यांनी टि्वट करीत शिंदे यांच्यावर निशाना साधला आहे. आपण काय बोलतो आहे हे लक्षात आल्यावर ज्योतिरादीत्य शिंदे यांनी सांगितले की कमळाच्या फुलाचे बटन दाबा आणि हाताच्या पंजाच्या बटनाला सोडून द्या...' 

यावर काँग्रेसने म्हटलं आहे की, हृदयातील गोष्ट जीभेवर येतेच येते. त्यांनाही माहितीय की कमल नाथ आणि हाताचा पंजा पुन्हा एकदा निवडून येणार आहे. ज्योतिरादित्या शिंदे हे आधी काँग्रेसमधील तरुण फळीतील एक महत्वाचे नेते मानले जायचे. मात्र, त्यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख