‘यूपी’त पुन्हा थरार : भाजप नेत्याने अधिकाऱ्यांसमोरच झाडल्या तरुणावर गोळ्या  - In UP, a BJP leader shot a young man in front of government officials | Politics Marathi News - Sarkarnama

‘यूपी’त पुन्हा थरार : भाजप नेत्याने अधिकाऱ्यांसमोरच झाडल्या तरुणावर गोळ्या 

वृत्तसंस्था
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

भाजपचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी या प्रकरणातील आरोपीच्या कृत्याचे समर्थन केले आहे.

लखनौ : भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात उपविभागीय न्यायदंडाधिकारी आणि मुख्य अधिकाऱ्यांसमोरच एका तरुणाची गोळ्या घालून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुख्य आरोपी धीरेंद्रसिंह हा भाजपचे आमदार सुरेंद्रसिंह यांचा निकटवर्तीय आहे. शिवाय धीरेंद्रसिंह हा स्वतः भाजपचाच या भागातील बाहुबली नेता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दरम्यान, गोळीबाराच्या या घटनेनंतर धीरेंद्र फरारी झाला असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांची सहा पथके विविध ठिकाणांवर रवाना झाली आहेत. या घटनेप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

बलिया जिल्ह्यातील दुर्जनपूर आणि हनुमानगंजमधील सरकारी कोट्यातील दोन दुकानांचा लिलाव करण्यासाठी पंचायत भवनात बैठक बोलाविण्यात आली होती. या वेळी स्थानिक प्रशासनातील अनेक बडे अधिकारीही उपस्थित होते. या दुकानांसाठी 4 स्वयंसहाय्यता बचत गटांनी अर्ज केले होते. 

दुर्जनपूर येथील दुकानांसाठी दोन गटांमध्ये मतदान घेण्याचे निर्देश देण्यात आले, या वेळी अधिकाऱ्यांनी आधार अथवा अन्य दुसरे ओळखपत्र असणाऱ्यांनाच मतदानाचा अधिकार असेल, असे सांगितले. येथे एका गटाकडे ओळखीचा कोणताही पुरावा नसल्याने हा चिघळला. यानंतर धीरेंद्रने जयप्रकाश ऊर्फ गामा पाल यांच्यावर गोळ्या झाडल्या. या त्यांचा मृत्यू झाला. 

भाजपचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी या प्रकरणातील आरोपीच्या कृत्याचे समर्थन केले आहे. कोणी वडील, वहिनी आणि पत्नीला मारहाण करणार असेल, तर हीच प्रतिक्रिया उमटेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

बलियातील घटना चिंताजनक आहे. महिला आणि मुलींवरील अत्याचार वाढत चालले आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेने अखेरचा श्‍वास घेतल्याचे दिसून येते. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी टीका बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी योगी सरकारवर केली आहे. 

बलियामध्ये जे काही घडले, ते प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर घडले. यावरून कायदा आणि सुव्यवस्थेची विदारक स्थिती दिसून येते. आता एन्काउंटरवाली सरकार आणखी कुणाची गाडी उलथविते की नाही, हे पाहावे लागेल, अशी बोचरी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख