श्रीलंकेत भाजप सरकार? निवडणूक आयोगानं दिलं हे उत्तर... - BJP Cant Form Political Entity In Country says Sri Lanka election commission | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीलंकेत भाजप सरकार? निवडणूक आयोगानं दिलं हे उत्तर...

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

गृहमंत्री अमित शहा यांची नेपाळ आणि श्रीलंकेत भाजपचे सरकार आणण्याची योजना असल्याचे वक्तव्य त्रिपुराचे बिप्लव देव यांनी केले होते.

कोलंबो : गृहमंत्री अमित शहा यांची नेपाळ आणि श्रीलंकेत भाजपचे सरकार आणण्याची योजना असल्याचे वक्तव्य त्रिपुराचे बिप्लव देव यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर आता श्रीलंकन निवडणूक आयोगानेही या चर्चेवर महत्वाचे विधान केले आहे. 

श्रीलंकातील निवडणूक आयोगाचे प्रमुख निमल पंचीवा यांनी भारतात सुरू असलेल्या या चर्चेवरून खुलासा केला आहे. ते म्हणाले, ''श्रीलंकेतील कोणताही राजकीय पक्ष विदेशातील कोणत्याही राजकीय पक्ष किंवा समुहाशी संबंध ठेऊ शकतो. मात्र, अन्य देशांतील पक्षाला श्रीलंकेत काम करण्यास आमचा निवडणूक कायदा मान्यता देत नाही.''

दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर बिप्लव देव यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. नुकतेच त्यांनी थेट आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयी टिप्पणी केली. अगरतळा येथील भाजपच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांना २०१८ मध्ये झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान झालेल्या चर्चेची माहिती दिली. 

ते म्हणाले, ''अमित शहा हे भाजपचे अध्यक्ष असताना अनेक राज्यांमध्ये अनेक राज्यांमध्ये पक्षाने सत्ता मिळविली. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या विदेशातील विस्तारावरही चर्चा केली होती. भाजपचे उत्तर-पूर्व झोनल सचिव अजय जमवाल म्हणाले होते की, भाजपाने अनेक राज्यांत सत्ता मिळविली आहे. त्यांना उत्तर देताना अमित शहा म्हणाले, अजून श्रीलंका आणि नेपाळ बाकी आहे. आपल्याला श्रीलंका आणि नेपाळमध्ये सत्ता आणण्यासाठी पक्षाचा विस्तार करायचा आहे,'' असा दावा देव यांनी केला आहे.  
देव पुढे म्हणाले की, ''देशात २०१४ मध्ये एनडीएची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सार्कची देशांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांचाही समावेश होता. कारण भारताला शेजारील देशांसोबत पुढे जायचे होते.'' देव यांच्या या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी टीका सुरू केली आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख