अयोध्येत भाजपला दणका; पंचायत निवडणुकीत पिछाडीवर, सपाची बाजी - BJP candidates trails in ayodhya panchayat election | Politics Marathi News - Sarkarnama

अयोध्येत भाजपला दणका; पंचायत निवडणुकीत पिछाडीवर, सपाची बाजी

वृत्तसंस्था
सोमवार, 3 मे 2021

अयोध्येतील एकूण 40 जागांपैकी समाजवादी पक्षाचे उमेदवार 28 जागांवर आघाडीवर आहेत.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत पुढील वर्षी होणार आहेत. त्याआधी राज्यातील त्रिस्तरीय पंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या. ही निवडणूक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी मिनी विधानसभा मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येत राम मंदिराचे काम सुरू होणे, भाजपसाठी महत्वाचे मानले जात होते. पण त्यानंतरही पंचायत निवडणुकीत अयोध्येतच भाजपला मतदारांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसत नाही.

पंचायत निवडणुकांची मतमोजणी रविवारी सकाळीच सुरू झाली आहे. सायंकाळपर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, अयोध्येतील एकूण 40 जागांपैकी समाजवादी पक्षाचे उमेदवार 28 जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजपला केवळ आठ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर अन्य जागांवर इतर उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. अद्याप निकाल जाहीर झाले नसले तरी समाजवादी पक्षाने घेतलेली आघाडी भाजपची चिंता वाढवणारी आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पंचायत निवडणूक घेण्याचे आदेश न्यायालयानेच दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या 3 हजार 50 जागांसाठी मतदान झाले. त्यापैकी 702 जागांवर भाजपला, 504 जागांवर सपा, 132 जागांवर बसपा तर केवळ 62 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशातील काही भागात भाजपला शेतकरी आंदोलनाचाही फटका बसल्याचे निवडणूक निकालांवरून दिसत आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये बहुतेक जागांवर आरएलडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपच्या उमेदवार मोठ्या मतांच्या फरकाने पिछाडीवर असल्याचे समजते. या निवडणूक अनेक बड्या नेत्यांनाही झटका बसला आहे. सपाचे वरिष्ठ नेते राम गोविंद चौधरी यांचा मुलगा पराभूत झाला आहे. तर भाजपचे आमदार धनंजय कनौजिया यांच्या आईला पराभव पत्करावा लागला आहे. 

भाजपचे माजी खासदार हरिनारायण राजभर यांच्या मुलाचाही पराभव झाला आहे. भाजपचे गोरक्षनाथ विभागाचे उपाध्यक्ष देवेंद्र यादव यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. तसेच अपक्ष आमदार राम गोविंद चौधरी यांच्या मुलाचा पराभव झाला आहे. त्याचप्रमाणे अनेक नेत्यांचे नातेवाईकांना मतदारांनी या निवडणुकीत घरी बसवले आहे. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख