गुजरातमध्ये भाजपचाच डंका; सहा महापालिकांमध्ये आघाडी... - BJP ahead in Gujarat municipal election results | Politics Marathi News - Sarkarnama

गुजरातमध्ये भाजपचाच डंका; सहा महापालिकांमध्ये आघाडी...

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

गुजरातमधील सहा महानगरपालिका भाजपच्याच हाती जाणार असल्याचे मतमोजणीवरून स्पष्ट होत आहे.

अहमदाबाद : गुजरातमधील सहा महानगरपालिका भाजपच्याच हाती जाणार असल्याचे मतमोजणीवरून स्पष्ट होत आहे. अहमदाबादसह, सूरत, वडोदरा, जामनगर, भावनगर आणि राजकोट महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान झाले आहे. आज मतमोजणी सुरू असून सहाही ठिकाणी काँग्रेस आणि आप पिछाडीवर आहे.

गुजरात मधील सहा महापालिकांमध्ये १४४ वॉर्डमध्ये २२७५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीत मतदान कमी झाल्याने त्याचा फायदा कोणाला होणार, याची चर्चा आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार केवळ ४६.१ टक्के मतदान झाले आहे. त्यातही अहमदाबादमध्ये सर्वात कमी ४२.५ टक्के मतदान झाले. 

आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये सहाही महापालिकांत भाजपने आघाडी घेतल्याचे दिसते. अहमदाबाद महापालिकेत ६२ जागांवर भाजप, १० जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. सूरतमध्ये भाजपला ४० तर काँग्रेसला १० जागांवर आघाडी मिळाली आहे. वडोदरा महापालिकेत भाजप व काँग्रेसमध्ये चढोओढ सुरू आहे. भाजपचे ११ तर काँग्रेसचे १० उमेदवरा आघाडीवर असल्याचे सुरूवातीच्या मतमोजणीवरून दिसते.

हेही वाचा : माजी खासदार धनंजय महाडिकांवर गुन्हा...

राजकोटमध्ये भाजप २०, काँग्रेस केवळ दोन, जामनगरमध्ये भाजप ११ आणि काँग्रेस ६ तर भावनगरमध्ये २३ जागांवर भाजप आणि ६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे अहमदाबादमध्ये चार जागांवर एआयएमआयएमने आघाडी घेतली असून सूरतमध्ये १८ जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर असल्याने चुरस निर्माण झाली आहे. 

सहाही महापालिकेत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याने पुन्हा एकदा भाजपची सत्ता येण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीही सहाही महापालिका भाजपच्याच ताब्यात आहे. पंजामध्ये नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा विजय झाला. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका झाल्याने पंजाबमधील निवडणुकांना महत्व होते. त्यापाठोपाठ गुजरातमध्येही निवडणुका झाल्या. पण शेतकरी आंदोलनाचा कोणताही परिणाम या निवडणुकांवर झाल्याचे दिसत नाही. 

Edited by Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख