जगातील सर्वात महागडा घटस्फोट? बिल अन् मेलिंडा गेट्स 27 वर्षांनंतर होणार वेगळे - Bill gates and melinda gates head for divorce after 27 years together | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

जगातील सर्वात महागडा घटस्फोट? बिल अन् मेलिंडा गेट्स 27 वर्षांनंतर होणार वेगळे

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 मे 2021

बिल गेट्स आणि मेलिंडा यांचा विवाह 1994 मध्ये झाला आहे. पत्नी-पत्नी म्हणून त्यांनी एकमेकांची 27 वर्षे सोबत केली.

नवी दिल्ली : मायक्रोसॅाफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) आणि त्यांची पत्नी मेलिंडा (Melinda Gates) यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास तीन दशकांच्या सोबतीनंतर त्यांनी घटस्फोट (Bill Gates Melinda gates divorce) घेण्याची घोषणा केली आहे. याबाबत दोघांनीही एकत्रितपणे निवेदन प्रसिध्द केलं आहे. दरम्यान, हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरण्याची शक्यता आहे.

बिल गेट्स आणि मेलिंडा यांचा विवाह 1994 मध्ये झाला आहे. पत्नी-पत्नी म्हणून त्यांनी एकमेकांची 27 वर्षे सोबत केली. लग्नापूर्वी ते 1987 मध्ये एकमेकांना भेटले होते. बिल गेट्स हे अब्जाधीश असून दानशूर म्हणूनही त्यांची ओळख आहे. कोरोना काळातही त्यांनी गरीब देशांना लस मिळावी, यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये दिले आहेत. तसेच जगभरातील आरोग्य विषयक समस्यांसाठीही त्यांच्याकडून सातत्याने मदतीचा हात पुढे असतो. पण गेट्स दाम्पत्याने वेगळं होण्याचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला आहे. 

गेट्स यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनानुसार, आमच्या नात्यांसदर्भात खूप चर्चा आणि विचार केल्यानंतर नाते संपविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 27 वर्षांत तीन मुलांचे संगोपन केले आहे. तसेच एक फाऊंडेशनही स्थापन केले असून त्यामाध्यमातून जगभरातील लोकांना चांगले आरोग्य आणि आयुष्यासाठी काम करत आहोत.

हेही वाचा : धक्कादायक : देशात पहिल्यांदाच घडलं असं...आठ सिंह कोरोना पॅाझिटिव्ह

या मिशनसाठी आम्ही फाऊंडेशनच्या माध्यमातून यापुढेही एकत्र काम करणार आहोत. पण पुढील आयुष्याच्या पुढील वाटचालीत पती-पत्नी म्हणून आम्ही एकत्र असणार नाही. आम्ही नवे आयुष्य सुरू करत आहोत. अशावेळी लोकांकडून आमच्या कुटूंबात हस्तक्षेप करू नये, अशी अपेक्षा आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

गेट्स यांची संपत्ती 10 हजार अब्जांहून अधिक आहे. त्यांनी मायक्रोसॅाफ्टमधील गुंतवणूक कमी केली असून बिल अॅन्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनमध्ये अधिक गुंतवणूक आहे. बिल गेट्स हे सध्या 65 वर्षांचे असून जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर मेलिंडा गेट्स 56 वर्षांच्या आहेत. फाऊंडेशनमध्ये ते एकत्रितच काम करणार असल्याने घटस्फोटानंतर त्याचे विभाजन होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

दरम्यान, यापूर्वी अॅमेझॅानचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस आणि मॅकेन्झी बेजोस यांचा दोन वर्षांपूर्वी झालेला घटस्फोट सर्वात महागडा ठरला होता. या घटस्फोटानंतर मॅकेन्झी या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत जाऊन बसल्या. 

Edited By Rajanand More

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख