बिहारच्या निकालात प्रत्येक पक्षाला, नेत्याला `गिफ्ट` मिळाले... अपवाद राहुल यांची काॅंग्रेस! - Bihar's result makes happy every leader and party Except Rahul and Congress | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारच्या निकालात प्रत्येक पक्षाला, नेत्याला `गिफ्ट` मिळाले... अपवाद राहुल यांची काॅंग्रेस!

अमोल कविटकर
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

नितीश, तेजस्वी, एमआयएम आणि एवढेच काय डाव्या पक्षांनाही बिहार निवडणुकीत `गिफ्ट` मिळाले...

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) काठावर यश मिळवले असले, तरी या निवडणुकीतील निकाल काँग्रेस वगळता इतर पक्षांना समाधान देणारा आणि 'खुश' करणारा ठरला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेली मोठी निवडणूक, दोन पिढ्यांमधील राजकीय संघर्ष आणि तेजस्वी यादव यांचे राजकीय भवितव्य ठरवणारी निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे राजकीय जाणकारांच्या देशभरातून नजरा होत्या.

नितीशकुमारांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर, तरीही तेच मुख्यमंत्री !

सलग पंधरा वर्षे सत्तेत राहिलेले नितीशकुमार यांना 'अँटी इंकंबन्सी' आणि चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाच्या उमेदवारांचा फटका बसला. त्यामुळे आरजेडी पक्ष तिसऱ्या क्रमांकावर राहिला. मात्र असे असतानाही क्रमांक तीनच्या पक्षाचे नेते नितीशकुमार मुख्यमंत्री होणार आहेत.

 

 

भाजपचा 'स्ट्राईक रेट' वाढला !

भारतीय जनता पक्षाने यंदा बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ११० जागा लढल्या, त्यात त्यांना ७४ जागांवर यश आले आहे. स्ट्राईक रेटचा विचार करता तो ६७ टक्के इतका आहे. २०१५ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे हाच स्ट्राईक रेट अवघे ३४ टक्के इतका खाली होता.

'तेजस्वी' व्यक्तिमत्वावर शिक्कामोर्तब !

प्रचारादरम्यान आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या झालेल्या सभांची गर्दी देशभरात चर्चेचा विषय ठरली. अवघ्या तिशीतील तरुणाने संपूर्ण बिहार पिंजून काढत २१ दिवसांच्या कालावधीत २५१ सभा तर घेत बिहारच्या राजकारणात विक्रम नोंदवला. वडील आणि बिहारचे प्रभावी राजकारणी लालू प्रसाद यादव हे प्रत्यक्ष सोबत नसताना, समोरुन सत्ताधारी पक्षाची प्रचंड यंत्रणा असताना आणि कमकुवत असलेल्या काँग्रेसला सोबत घेऊन तेजस्वी यांनी एकाकी झुंज दिली. स्वतःच्या आरजेडी पक्षाला बिहारमधील क्रमांक एकचा पक्ष केला असून ७५ जागा आरजेडीला मिळाल्या.

डाव्यांना 'अच्छे दिन' !

बिहार विधानसभा निवडणुकीत भाकप, माकप आणि कम्युनिस्ट पक्ष (लिबरेशन) यांनी महागठबंधनशी घरोबा केला. याचा मोठा फायदा या तीनही पक्षांना झाल्याचे दिसून येत असून भाकप २, माकप २ आणि कम्युनिस्ट पक्ष (लिबरेशन) १२ अशा एकूण १६ जागांवर डाव्या पक्षांनी बाजी मारली आहे. बिहारमध्ये ही आकडेवारी म्हणजे डाव्या पक्षांना नवसंजीवनी मिळाल्याचे बोलले जात आहे. या विजयात आरजेडीचा मोठा वाटा आहे.

... तरीही चिराग पासवान खुश !

लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांचीही तेजस्वी यादव यांच्याप्रमाणे देशभर चर्चा झाली. नीतीशकुमार यांच्या पक्षाला 'डॅमेज' करण्यासाठीच पासवान यांनी एनडीएपासून स्वतःची वेगळी चूल मांडली. स्वतःच्या पक्षाच्या यशापेक्षा नीतीशकुमार यांच्या जागांचे गणित बिगडवायचे या इराद्याने ते मैदानात उतरले होते. यात त्यांना यश आल्याचे चित्र आहे. कारण लोजपाचा मोठा फटका जेडीयुला बसला असून यामुळे जेडीयुच्या जागांमध्ये घसरण झाली आहे. ही बाब पासवान यांना सुखावणारी आहे.

'एमआयएम'ची दमदार कामगिरी

बिहारच्या राजकारणात एमआयएमचे स्थान निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या असदुद्दीन ओवैसी यांना यंदा मात्र चांगले यश मिळाले असून एमआयएमचे ५ आमदार निवडून आले आहेत. २०१५ च्या निवडणुकीत एमआयएमला अवघ्या एका जागेवर यश मिळाले होते. यंदा मात्र ओवैसी यांनी आधीपासूनच मुस्लिम बहुल भागात लक्ष केंद्रीत करुन यश मिळवले आहे. विशेष म्हणजे एमआयएम कामगिरी एनडीएला फायद्याची तर महागठबंधनचे नुकसान करणारी ठरली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख