बिहारमधील निवडणूक प्रचार गेला खालच्या पातळीवर  - Bihar Elections Campaign Leaders using Filthy language | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारमधील निवडणूक प्रचार गेला खालच्या पातळीवर 

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराने आता खालची पातळी गाठली आहे. स्वतः बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही यात मागे नाहीत. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर नितीश कुमार यांनी खालच्या पातळीवर उतरुन टीका केली आहे. लालूंचे पूत्र तेजस्वी यादव यांनीही नितीश कुमार यांना ट्वीट करुन उत्तर दिले आहे

पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराने आता खालची पातळी गाठली आहे. स्वतः बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही यात मागे नाहीत. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर नितीश कुमार यांनी खालच्या पातळीवर उतरुन टीका केली आहे. लालूंचे पूत्र तेजस्वी यादव यांनीही नितीश कुमार यांना ट्वीट करुन उत्तर दिले आहे.

बिहारमध्ये उद्या पहिल्या टप्प्यातले मतदान होत आहे. या टप्प्यातला प्रचार संपत असताना नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलावर खालच्या पातळीवर उतरत टीका केली. ''आठ-आठ, नऊ-नऊ मुले जन्माला घालणारे विकासाच्या गप्पा करत आहेत. पूत्र होण्याच्या लालसेपायी काही मुली जन्माला आल्या. याचा अर्थ मुलींवर विश्वास नाही. असे लोक बिहारचा विकास काय करणार,'' असे वक्तव्य नितिश कुमार यांनी काल केले. 

नितीश कुमार यांच्या या विधानावरुन राष्ट्रीय जनता दलाचे नेते चांगलेच संतापले आहेत. लालूंचे पूत्र तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांना उत्तर दिले आहे. "नितीश माझ्याबाबत जे काही बोलतील ते माझ्या दृष्टीने आशीर्वादच असतील. नितीश कुमार शरीराने आणि मनाने थकले आहेत. त्यामुळे ते तोंडाला येईल ते बोलत आहेत. त्यांचे प्रत्येक विधान मी आशीर्वाद म्हणून मी स्वीकारतो. यावेळी बिहारमध्ये विकास आणि रोजी-रोटीच्या मुद्द्यावरच निवडणूक होईल,'' असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

"नितीश कुमार यांनी हे वक्तव्य करुन माझ्या मातेच्या भावनांचा आणि महिलांचा अपमान केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सहा भावंडे आहेत, हे नितीश कुमार विसरलेले दिसतात. नितीश कुमार महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी हे विषय सोडून भलत्याच विषयावर बोलत आहेत," असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख