#Bihar election अनेक पक्ष, तीन आघाड्या  कोण बाजी मारेल..

भारतीय राजकारणाचा "दिमाग' काबीज केलेला असला तरी "दिल' पूर्णत्वाने काबीज करणे त्यांना जमलेले नाही. त्यासाठी त्यांची धडपड आहे.
44Bihar_Nitish_faces_litmus_t_0.jpg
44Bihar_Nitish_faces_litmus_t_0.jpg

नवी दिल्ली : बिहारच्या निवडणूक रिंगणात अनेक पक्ष, तीन आघाड्या असल्या तरी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासमोर विरोधक आणि आघाडी अंतर्गत आव्हान निर्माण केलेले आहे. त्यावर मात करत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी त्यांना आपल्या नेतृत्वाचा आणि राजकीय मुत्सद्दीपणा, धूर्तपणाचा कस लावावा लागणार आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आतापर्यंत एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीचे वेगवेगळे पैलू समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. यामध्ये रंग भरणारे राजकीय कलाकार आपापले आविष्कार दाखवू लागल्याने निवडणुकीबद्दलची उत्कंठा वाढत आहे.

एकीकडे कोरोना विषाणूची छाया आणि लोकांमधील धास्ती या पार्श्‍वभूमीवर निवडणूक होत आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, कोरोना छायेतली ही सर्वात मोठी निवडणूक ठरेल. एक प्रकारे हा प्रयोगच आहे. कोरोनाच्या छायेत मतदार लोकशाहीतल्या पवित्र कर्तव्याकडे कसे पाहतात, याचा आदमासही यानिमित्ताने येईल. कदाचित या अनुभवावरुन पुढील निवडणुकांचे भवितव्य काय राहील, हेही समजेल.

बिहार हा भारतीय राजकारणाचा अर्क आहे. फार पूर्वी विश्‍वनाथ प्रतापसिंह यांनी एका अनौपचारिक गप्पांमध्ये उत्तर प्रदेश हा भारतीय राजकारणाचा "दिमाग' तर बिहार "दिल' असल्याचे म्हटले होते आणि आपल्याच कोटीवर ते गडगडाटी हसलेसुद्धा होते. त्यांनी त्यावेळी मांडलेल्या सिद्धांतानुसार हे प्रदेश म्हणजे भारतीय राजकारणाचे "हार्ट'(दिल) आणि "माईंड'(मन-मेंदू) आहेत. ज्याला भारतावर राज्य करायचे त्याने प्रथम हे काबीज केले पाहिजेत. भाजपने भारतीय राजकारणाचा "दिमाग' काबीज केलेला असला तरी "दिल' पूर्णत्वाने काबीज करणे त्यांना जमलेले नाही. त्यासाठी त्यांची धडपड आहे. 

लालू, पास्वान वारसदारांशी सामना 

बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी निवडणूक होत आहे. पंधरा वर्षे मुख्यमंत्री राहून नितीशकुमार यांनी बिहारमध्ये स्वतःचा विक्रम केला आहे. ही निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण असेल. कारण गेल्या पंचवीस ते तीस वर्षांत बिहारच्या राजकारणावर ज्या तीन नेत्यांचा वरचष्मा होता, त्यात नितीशकुमार यांच्याखेरीज रामविलास पास्वान आणि लालूप्रसाद यादव यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे तिघांचीही राजकीय पार्श्‍वभूमी व विचारसरणी समाजवादी आणि राममनोहर लोहिया-जयप्रकाश नारायण यांना मानणारी आहे. कर्पुरी ठाकूर हे त्यांचे आदर्श ! एकेकाळी एकत्र असलेले हे तिघे राजकीय प्रवासात एकमेकांपासून दुरावले; आपापले पक्ष थाटून त्यांनी आपले राजकारण सुरु ठेवले. आता तिघांपैकी केवळ नितीशकुमारच रिंगणात आहेत. 

रामविलास पास्वान गंभीर आजाराने अंथरुणाला खिळलेले आहेत. लालूप्रसाद तुरुंगात आहेत. त्यांना निवडणुकीसाठी जामीन मिळणे अशक्‍यच आहे. त्यांची प्रकृतीदेखील फारशी नीट राहिलेली नाही. विशेष म्हणजे नितीशकुमार यांना या दोन नेत्यांच्या तरुण वारसदारांशी सामना करावा लागणार आहे. यातील लालूप्रसाद यांचे पुत्र तेजस्वी हे त्यांच्या उघड विरोधात आहेत. परंतु पास्वान यांचे पुत्र चिराग हे उघडपणे त्यांच्या विरोधात असले तरी त्यांनी भाजपची साथदेखील सोडलेली नाही. एकप्रकारे चिराग हे त्यांच्या "घरातले'च प्रतिस्पर्धी आहेत आणि त्याचा त्रास नितीशकुमार यांना अधिक होत असणार हे उघड आहे. 

नितीशकुमारांना घेरण्याचे प्रयत्न

बिहारमधील लढत ही मुख्यतः नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील आघाडी विरुद्ध राष्ट्रीय जनता दलाच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस, डावे आणि अन्य पक्ष यांच्या आघाडीत राहील. परंतु यावेळी भाजप आघाडी आणि राष्ट्रीय जनता दल प्रणित महागठबंधन यांच्या कडवट अनुभवाने कंटाळून उपेंद्र कुशवाह यांनी तिसरी आघाडी स्थापली आहे. यामध्ये बहुजन समाज पक्ष आणि काही लहानसहान स्थानिक पक्ष आहेत. शुक्रवारी रात्रीच्या माहितीनुसार चिराग पास्वान आणि भाजपचे नेते गृहमंत्री अमित शहा व पक्षाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्यातील चर्चेत जागावाटपाबाबत समाधानकारक तोडगा निघू शकला नव्हता. त्यामुळे नवाच तोडगा यावेळी काढण्यात आला. त्यानुसार पास्वान यांचा लोकजनशक्ती पक्ष बिहारमधील सर्व जागांवर स्वतंत्रपणे लढेल. भाजपने या पक्षाला देऊ केलेल्या सुमारे सत्तावीस ते तीस जागांवर भाजप त्यांचे उमेदवार उभे करणार नाही, अशी रणनीती आखली आहे. अन्यत्र मात्र हा पक्ष नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या विरोधात उमेदवार उभे करेल.

पास्वानांना कोणाचे प्रोत्साहन?

नितीशकुमार यांनी त्यांचा पक्ष 115 जागा लढविणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते. उर्वरित 128 जागांपैकी भाजपने पास्वान यांना जागा द्याव्यात, असे त्यांनी सुचवले होते. परंतु पास्वान यांची भूक वाढलेली होती. त्यामुळे त्यांनी गेल्या वेळेपेक्षा अधिक जागांची मागणी सुरुवातीपासूनच केलेली होती. नितीशकुमार स्वतःच्या जागा कमी करुन पास्वान यांना देण्याची शक्‍यताच नव्हती. त्यामुळे त्यांनी भाजपने त्यांच्या कोट्यातून पास्वान यांना जागा द्याव्यात, असे सांगून भाजपला तेरा जागा अधिक देऊ केल्या. नितीशकुमार यांच्याखेरीज बिहारमध्ये पर्याय नसल्याने भाजपला त्यांचे नेतृत्व मान्य करणे आणि त्यांचा वरचष्मा सहन करणे याखेरीज पर्याय नव्हता. त्यामुळेच पास्वान यांना प्रोत्साहन देण्यामागे भाजपचाच हात असल्याचे जाणकार सांगतात. ते तर्कसंगतही वाटते. कारण नितीशकुमारांचे संख्याबळ घटवायचे असेल तर तिरंगी, चौरंगी लढती आवश्‍यक आहेत.

आव्हानात्मक निवडणूक 

नितीशकुमार यांच्या जागा घटणे म्हणजे त्यांचे भाजपवरील अवलंबित्व वाढेल आणि मग त्यांची सत्तावाटपातील "बार्गेनिंग पॉवर' म्हणजेच "घासाघीस क्षमता' कमी होईल. त्यांना आपल्या इशाऱ्यावर नाचवायचे, अशी भाजपची रणनीती असल्याचे सांगितले जाते.नितीशकुमार यांचे राजकीय पंख कापणे ही भाजपच्या दृष्टीने काळाची गरज आहे. कारण भाजपला भारतीय राजकारणाचे हे "दिल' काबीज करायचे असेल तर त्यांना नितीशकुमारांवरील अवलंबित्व संपवावे लागेल. पास्वान यांच्या माध्यमातून त्यांना हे सोपे वाटते. कारण पास्वान यांची राजकीय ताकद बेटकुळी (बेडकी) एवढीच मर्यादित आहे, परंतु महत्वपूर्ण आहे. एका विशिष्ट समाजात त्यांना स्थान आहे. परंतु नितीशकुमार यांनी त्यांचे नेतृत्व गेल्या पंधरा वर्षात "बिहारव्यापी' (पॅन बिहार) केले आहे. आता त्यांच्या तोलामोलाएवढा नेता बिहारच्या राजकीय क्षितिजावर नाही. हा त्यांचा सर्वात मोठा निर्णायक असा पैलू आहे. त्यामुळे उपेंद्र कुशवाह व त्यांच्याबरोबरचे इतर बहुजन समाज पक्षासारखे (बिहारमधील) लिंबूटिंबू पक्ष असतील, त्यांनाही भाजपतर्फे चोरटी मदत होत आहे.

पूर्वी एक बालनाटक होते "हेमा आणि सात बुटके" भाजपला हेमाची भूमिका निभावून अवतीभवती सात बुटके ठेवून राज्य करायची इच्छा होऊ लागली आहे. नितीशकुमार नवखे राजकारणी नाहीत. त्यांनाही हे डावपेच समजतात. कोणत्यावेळी कशी कोलांट उडी मारायची या कसरतीत त्यांचा हात धरणारा नेता सध्या तरी नाही. ते उचित वेळी उचित निर्णय करतील.

विरोधी आघाडीत राष्ट्रीय जनता दल, कॉंग्रेस, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्ष यांचा समावेश आहे. मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव यांना मान्यता मिळालेली नाही आणि लालूप्रसाद यांनीदेखील ती बाब निवडणुकीनंतर विचारात घेऊ, असे सूचित करुन किमान निवडणुकीपर्यंत सर्व घटक पक्षांना शांत केले आहे. लालूप्रसाद यांची यादव आणि मुस्लिम ही व्होटबॅंक अजूनही अभेद्य मानली जाते. कम्युनिस्ट आणि अन्य पक्षांमुळे कष्टकरी आणि गरीब जनतेची मते मिळतील, अशी आशा त्यांना वाटते. विरोधी आघाडीत "नेतृत्व-चेहऱ्याची' कमतरता आहे. बिहारचे राजकीय पटल विखुरलेलेच आहे. त्यामुळेच सरतेशेवटी कोण बाजी मारेल, याची उत्कंठा शेवटपर्यंत राहील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com