#Bihar Election  एनडीएमधील अस्पष्टता कायम  ; पासवान वेगळा मार्ग स्वीकारणार...   - Bihar Election Chirag Paswan will take a different path  | Politics Marathi News - Sarkarnama

#Bihar Election  एनडीएमधील अस्पष्टता कायम  ; पासवान वेगळा मार्ग स्वीकारणार...  

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

आगामी दोन दिवसांत एनडीएमध्ये रहायचे की बाहेर पडायचे याचा निर्णय चिराग पासवान जाहीर करण्याची शकयता आहे.

नवी दिल्ली : बिहार निवडणुकीची रमधुमाळी सुरू झाली आहे. ता. 28 ऑक्‍टोबरला होणाऱ्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली असून सत्‌तारूढ एनडीएमधील धुसफूस थांबत नसल्याचे पाहून भाजप नेतृत्वाने व गृहमंत्री अमित शहा यांनी स्वतःच याबाबत पुढाकार घेतला आहे. लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक व केंद्रीय मंत्री रामविलास पासवान गंभीर आजारी आहेत त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

त्यांच्या अनुपस्थितीत चिराग पासवान यांच्यावर पक्षाची जबाबदारी आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणारी ही पहिलीच निवडणूक ठरणार आहे. सत्तारूढ जदयूच्या संतप्त भूमिकेमुळे चिराग यांनी वेगळा मार्ग स्वीकारण्याचे संकेत दिले होते. 

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आघाडीत (एनडीए) नाराज असलेल्या लोकजनशक्ती पक्षाचे नवे नेते चिराग पासवान यांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. मात्र जागावाटपाच्या पेचावर तोडगा निघू शकला नाही.

चिराग यांच्यासमोर भाजपने 27 जागांचा प्रस्ताव ठेवल्याचे समजते. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाबरोबर बिनसल्याने चिराग पासवान यांच्यासमोर फारसे पर्यायही नाहीत. आगामी 2 दिवसांत ते एनडीएमध्ये रहायचे की बाहेर पडायचे याचा निर्णय जाहीर करण्याची शकयता आहे.

लोजपाच्या नेत्यांनी तर चिराग यांना बिहारचे भावी मुख्यमंत्री म्हणूनही जाहीर केले आहे. या अस्वस्थतेमुळे अमित शहा यांनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले. अकाली दलानंतर एनडीए सोडणाऱ्या पक्षांमध्ये भर पडू नये यासाठी भाजपचे सर्वेसर्वा नेतृत्व प्रयत्नशील आहे. चिराग यांच्या नेतृत्वाखालील लोजपाने विधानसभेत 42 किंवा 32 जागांची मागणी केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार 32 जागा मिळाल्या तर विधान परिषदेच्या 2 व राज्यसभेची 1 वाढीव जागाही चिराग यांनी मागितली आहे. त्यांनी एनडीएला निर्णय घेण्यासाठी अंतीम मुदत दिल्यचोही सूत्रांनी सांगितले. चिराग यांनी नड्डा-शहा यांना यापूर्वी पत्रे लिहिली होती. त्यांनी राज्यातील 143 जागांवर लढण्याची तयारी केल्याचे सांगितले जाते.

भाजपने त्यांना 27 जागा देण्याची तयारी दाखविली आहे. त्यावर घासाघीस सुरू आहे. लोजपाची राज्यातील शक्ती पहाता एवढ्या जागाही देऊ नयेत असे नितीशकुमार यांच्या पक्षाचे मत आहे. आगामी दोन दिवसांत चिराग यांची भूमिका स्पष्ट होऊ शकते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख