बायडेन विजयाच्या जवळ पोचले, ट्रम्प पराजय स्वीकारणार ? - Biden approaches victory, will Trump accept defeat? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

बायडेन विजयाच्या जवळ पोचले, ट्रम्प पराजय स्वीकारणार ?

वृत्तसंस्था
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये बायडेन म्हणाले की, ‘‘ अद्याप विजेता जाहीर झालेला नाही. आपण ही शर्यत जिंकणार आहोत.’’

वॉशिंग्टन : डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन हे अध्यक्षपदाच्या रेसमध्ये आज आणखी विजयाच्या समीप पोचले. राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये त्यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला असला तरीसुद्धा ट्रम्प मात्र अद्याप माघार घ्यायला तयार नाहीत.

अनेक राज्यांतील मतमोजणी सुरू असली तरीसुद्धा आता बायडेन यांच्या विजयाची केवळ औपचारिकताच शिल्लक असल्याचे बोलले जाते. 

या निकालांना आव्हान देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाने जोरदार तयारी केली आहे. 

मतमोजणीच्या चौथ्या दिवशी आज बायडेन यांच्या पारड्यात260 इतकी इलेक्‍टोरल मते पडली तर ट्रम्प यांची गाडी 214 मतांवरच अडली असल्याचे एडिसन रिसर्चने म्हटले आहे.

राजकीयदृष्या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पेनसिल्व्हानियातील इलेक्‍टोरल मते बायडेन यांच्या बाजूने पडली तर ते सहज बहुमताचा 270 चा आकडा ओलांडतील. 

जॉर्जिया, रिझोना आणि नेवाडा यापैकी दोन राज्यांमध्ये जरी बायडेन यांनी आघाडी घेतली तर ते त्यांच्या पथ्यावर पडेल. या राज्यांमध्ये शुक्रवारी देखील मतमोजणी सुरूच आहे. राष्ट्रीय पातळीवर मतांच्या बाबतीत बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावरी आघाडी घेतली आहे. 

विजय आपलाच होणार : बायडेन
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांचीच सरशी होणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. ही निवडणूक आपणच जिंकणार असा निर्धारही त्यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात बोलून दाखविला.

पेनसिल्व्हानिया आणि जॉर्जिया या दोन्ही राज्यांत बायडेन यांनी आघाडी घेतली आहे. सध्या बायडेन यांच्याकडे ५३८ पैकी एवढी २६४ इलेक्टोरल मते असून त्यांना बहुमताची मॅजिक फिगर गाठण्यासाठी आणखी सहा मतांची आवश्‍यकता आहे. 

आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये बायडेन म्हणाले की, ‘‘ अद्याप विजेता जाहीर झालेला नाही. आपण ही शर्यत जिंकणार आहोत.’’ डेल्वेअर येथील पक्षाच्या मुख्यालयातून केलेल्या भाषणामध्ये बोलताना बायडेन यांनी उपरोक्त मत मांडले. यावेळी त्यांच्यासोबत सहकारी सिनेटर कमला हॅरिस देखील उपस्थित होत्या पण त्यांनी भाषण करणे टाळले. बायडेन म्हणाले, देश आपल्या पाठीशी आहे. 

आपल्याला ७४ दशलक्ष एवढी मते मिळाली आहेत. अध्यक्षीय निवडणुकीतील हा आतापर्यंतचा विक्रम आहे. ट्रम्प यांना आपण चार दशलक्षांपेक्षाही अधिक मतांनी पराभूत करणार आहोत. हा फरक आणखी वाढत चालला आहे. मागील चोवीस वर्षांमध्ये रिझोना जिंकणारे आपण पहिले डेमोक्रॅट आहोत.

मागील २८ वर्षांच्या काळामध्ये प्रथमच आपण जॉर्जियामध्येही विजयश्री खेचून आणत आहोत. देशाच्या मध्यभागामध्ये आपण नव्याने निळ्या भिंतीची पुनर्बांधणी केली आहे. पेनसिल्व्हानिया, मिशीगन, विस्कॉन्सिन ही देशाची हृदयस्थाने आहेत.’’ 

कायदेशीर लढाई सुरू झाली आहे : ट्रम्प 
वॉशिंग्टन : ज्यो बायडेन चुकीच्या पद्धतीने अध्यक्षपदावर दावा करत असल्याचा आरोप अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अध्यक्षपदावर मी देखील दावा करू शकतो. कायदेशीर कारवाई आता कोठे सुरू झाली आहे, असे ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सध्या देशभर मतमोजणी सुरू असून ट्रम्प यांनी थेट लोकांची भेट घेण्याऐवजी ट्विटरच्या माध्यमातून संवाद साधण्यावर भर दिला आहे. आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, निवडणुकीच्या रात्री आम्ही अनेक राज्यांमध्ये आघाडीवर होतो पण नंतर मात्र ती अचानक गायब झाली. कायदेशीर लढाई पुढे जाईल तशी ही आघाडी देखील वाढेल असा विश्‍वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख