सरकारविरोधात षडयंत्र : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लष्करी अधिकाऱ्याला अटक - Bhutans senior SC judge top Army officer detained in conspiracy case | Politics Marathi News - Sarkarnama

सरकारविरोधात षडयंत्र : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लष्करी अधिकाऱ्याला अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

सरन्यायाधीश, लष्करप्रमुख आणि वरिष्ठ विधी अधिकाऱ्यांना हटविण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

थिंपू : सरकारविरोधात षडयंत्र रचल्याच्या आरोपावरून भूतान मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, लष्करी अधिकारी व जिल्हा न्यायाधीशांना अटक करण्यात आली आहे. सरन्यायाधीश, लष्करप्रमुख आणि वरिष्ठ विधी अधिकाऱ्यांना हटविण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. 

भूतानमधील सरकारी वृतपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, भूतान पोलिसांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश कुएनले तर्शिंग, लष्करी अधिकारी ब्रिगेडयर थिनले टोबेगी, जिल्हा न्यायाधीश येशी दोरजी यांना अटक केली आहे. भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे हे २०१९ मध्ये शपथ घेताना तर्शिंग उपस्थित होते. तर्शिंग यांनी मुंबई विद्यापीठात कायद्याची पदवी घेतल्याचे नुकतेच सांगितले होते. 

भूतानमधील कुएंसेल या वृत्तपत्रानुसार, तर्शिंग आणि येशी दोरजी यांच्यावर ११ आरोप ठेवण्यात आले आहेत. तर टोबेगी यांच्या पाच आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला. 

महिलेने दिली षडयंत्राची माहिती...

एका महिलेने या षडयंत्राची माहिती दिल्याचे समोर आले आहे. या महिलेला काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर तिने या षडयंत्राची माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या तिघांना संबंधित विभागामध्ये सर्वोच्च पदावर जायचे होते. दोरजी यांचा या षडयंत्रात थेट सहभाग नसला तरी त्यांना याबाबत माहिती असल्याचे एका वृत्तपत्राने म्हटले आहे. 

Edited By Rajanand More
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख