हरियानाचे प्रभारी करून तावडेंचे पुनर्वसन; रहाटकरांकडे दीव-दमण, तर पंकजा मध्यप्रदेशच्या सहप्रभारी - Bharatiya Janata Party announces appointments in charge of various states | Politics Marathi News - Sarkarnama

हरियानाचे प्रभारी करून तावडेंचे पुनर्वसन; रहाटकरांकडे दीव-दमण, तर पंकजा मध्यप्रदेशच्या सहप्रभारी

मंगेश वैशंपायन 
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

कैलास विजयवर्गीय यांच्या जोडीला भाजपच्या राष्ट्रीय आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याकडे या राज्याच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपविली आहे.

नवी दिल्ली : केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाने विविध राज्यांच्या प्रभारीच्या नियुक्‍त्या आज (ता. 13 नोव्हेंबर) जाहीर केल्या आहेत. त्यात महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडे दीव दमणची, तर गेल्या काही दिवसांपासून काहीसे दुर्लक्षित असलेल्या विनोद तावडे यांच्याकडे हरियानाच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या पश्‍चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कैलास विजयवर्गीय यांच्या जोडीला भाजपच्या राष्ट्रीय आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्याकडे या राज्याच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने सोपविली आहे. विजयवर्गीय यांच्या जोडीला तेवढेच वादग्रस्त ठरलेले मालवीय यांची नियुक्ती करून भाजप नेतृत्वाने एक सूचक संदेश त्या राज्यातील केडर आणि विरोधकांपर्यंत पोचविला आहे. 

विनोद तावडे यांच्याबरोबरच महाराष्ट्रातून दिल्लीच्या राष्ट्रीय संघटनेत बदली करण्यात आलेल्या पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेशच्या सहप्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुनील देवधर यांच्याकडे आंध्र प्रदेशाची जबाबदारी दिली आहे. त्रिपुरातील भाजपच्या पहिल्या वहिल्या विजयात महत्त्वाचा वाटा असलेले देवधर त्रिपुरा विजयानंतर तेलंगणा आणि आंध्रच्या सतत संपर्कात आहेत. 

भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने पुढील वर्षी होणाऱ्या पश्‍चिम बंगालची विधानसभा निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हिंसाचार हा भाजपने प्रचाराचा मुद्दा बनवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या विजय उत्सवानिमित्त झालेल्या मेळाव्यातही बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांविरुद्धच्या हिंसाचाराचा मुद्दा ममता यांचे नाव न घेता जोरकसपणे मांडला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख