बिहारचा रणसंग्राम : जनरल डायर बनण्याची परवानगी कोणी दिली?  - Battle of Bihar: Who gave permission to become General Dyer? | Politics Marathi News - Sarkarnama

बिहारचा रणसंग्राम : जनरल डायर बनण्याची परवानगी कोणी दिली? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020

नितीश कुमार राज्याचे गृहमंत्रीही आहेत, त्यांना पोलिस काय करणार आहेत, याची सूचना मिळाली असेलच ना?

पाटणा : बिहारमधील मुंगेर येथे दुर्गा विसर्जनाच्या वेळी सोमवारी (ता.२६) गोळीबार होऊन एकाचा मृत्यू झाला. या घटनेवरून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर आज हल्ला चढविला.

‘‘मुंगेरच्या पोलिसांना जनरल डायर बनण्याची परवानगी कोणी दिली?, असा प्रश्‍न करीत हा गोळीबार कोणाच्या तरी आदेशावरून झाला असल्याचा आरोप त्यांनी केला. 

उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी तेजस्वी यादव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. ‘जनरल डायरप्रमाणे वागण्याची परवानगी मुंगेर पोलिसांना कोणी दिली?, असा सवाल त्यांनी नितीश कुमार व उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना केला. गोळीबारातील मृताच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करीत या घटनेवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री काय कारवाई करणार आहेत, अशी विचारणाही त्यांनी केली. 

नितीश कुमार राज्याचे गृहमंत्रीही आहेत, त्यांना पोलिस काय करणार आहेत, याची सूचना मिळाली असेलच ना? उपमुख्यमंत्री सुशील कुमार हे भाजपचे नेते आहेत. त्यांनी या घटनेवर एक ट्विटशिवाय काय केले, याची माहिती द्यावी, अशी मागणी तेजस्वी यांनी केली. मुंगेरमध्ये सोमवारी सायंकाळी दुर्गा विसर्जनाच्या वेळी समाजकंटक व पोलिसांमध्ये दगडफेक व गोळीबार झाला होता. यात एक जण ठार झाला तर सुरक्षा कर्मचाऱ्यासह अनेक जण जखमी झाले. 

‘दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी’ 
तेजस्वी यादव म्हणाले, की व्हिडिओत आपण पाहिले असेल की, लोकांना शोधून आणि बसवून मारले जात आहे. या घटनेत बिहारच्या दुहेरी इंजिनच्या सरकारची भूमिका काय आहे, हा प्रश्‍नच आहे. उच्च न्यायालयाच्या नियंत्रणात याची चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जावी. तेथील जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना हटविले पाहिजे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख