#Ayodhya : १७५ मान्यवरांना निमंत्रण..१३५ संतांचाही समावेश

अयोध्येसह लगतच्या भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बाहेरील कोणत्याही व्यक्तीस शहरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
4Ayodhya_380_AP.jpg
4Ayodhya_380_AP.jpg

अयोध्या : राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी १७५ मान्यवरांना निमंत्रण दिले असून त्यात १३५ संतांचाही समावेश आहे. व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त पाचजण असतील. मोदींच्या हस्ते यावेळी ४० किलो वजनाच्या चांदीच्या कोनशिलेचे लोकार्पण करण्यात येईल. या सोहळ्यानिमित्त अयोध्येत ५१ हजार लाडूंचे वाटप होणार आहे. भूमिपूजनात सहभागी पाहुण्यांना चांदीचा शिक्का भेट देण्यात येणार आहे. शरयू नदीच्या तीरावर काल सायंकाळी रोषणाई करण्यात आली होती. आज संपूर्ण परिसर फुले, रांगोळ्यांनी सजला आहे.  

रामल्ललाचा जयघोष करणारे रामभक्त, गल्लीबोळात लावलेले भगवे ध्वज, अयोध्यावासियांच्या चेहऱ्यावर दिसणारे अलौकिक समाधान आणि रामराज्याप्रमाणे सजलेली अयोध्यानगरी.. ! प्रत्येकाने डोळ्यात साठवावे आणि साक्षीदार व्हावे, असे वातावरण राम जन्मभूमी अयोध्यानगरीत अनुभवायला मिळत आहे. कोरोना संकटाच्या काळात हा सोहळा असूनही मनात कोणतेही शल्य न बाळगता एकोप्याने हा सोहळा देदीप्यमान करण्यासाठी अयोध्यावासीय सरसावले आहेत.

राम जन्मभूमीचा वाद ४९२ वर्षांचा आणि त्यातही न्यायालयीन पातळीवर हा लढा जवळपास ७० वर्षे सुरू राहिला. जागेच्या वादात वेगवेगळ्या टप्प्यांवर स्थित्यंतरे आली. मात्र, सात दशकांच्या प्रतीक्षेनंतर वाद निकाली निघाला. विशेष म्हणजे मुस्लिम पक्षकार असलेल्या इक्बाल अन्सारी यांनाही या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्याचे निमंत्रण देत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने स्वागतार्ह निर्णय घेतला आणि त्याला अन्सारी यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सोहळ्यात सहभागी होण्याचे ठरविले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे तीन तास अयोध्यानगरीमध्ये व्यतीत करतील. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येसह लगतच्या भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बाहेरील कोणत्याही व्यक्तीस शहरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
 
राम मंदिराचे भूमिपूजनानिमित्त अयोध्येसह संपूर्ण उत्तर प्रदेश व देशातही उत्साहाचे वातावरण आहे. भूमिपूजनाआधी धार्मिक कार्यक्रमांना कालपासूनच सुरुवात झाली असून आज रामार्चा पूजा झाली. भूमिपूजनाच्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येत दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा देण्यात आला असल्याने व अनेक महत्त्वाच्या व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवलेला आहे.

भूमिपूजन परिसरात मोबाईल, कॅमेरा किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास परवानगी नाही. प्रत्येक निमंत्रण पत्रिकेवर क्रमांक आहेत. त्या क्रमांकाची यादी पोलिसांकडे देण्यात येणार आहे. हा क्रमांक आणि नाव पडताळूनच कार्यक्रमस्थळी प्रवेश देण्यात येणार आहे, असे श्रीराम जन्‍मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष चंपत राय यांनी सांगितले.

सुरक्षेसाठी...
- ओळखपत्राविना कोणालाही प्रवेश नाही
- रस्त्यांवर पोलिस, प्रादेशिक सशस्त्र पोलिस दल (पीएसी) आणि केंद्रीय निम लष्करी दला (सीपीएमएफ)चे जवान तैनात
- अयोध्येतील रस्त्यांवर संपूर्ण तपासणी
- कोपऱ्या-कोपऱ्यावर कडेकोट बंदोबस्त

निमंत्रितांसाठी...
- प्रत्येक पाहुण्यांना चांदीचे नाणे भेट
- नाण्यावर राम दरबार, तीर्थक्षेत्राचे प्रतीक आहे

प्रसादाच्या लाडवांसाठी...
- केरळहून वेलदोडे, काजू, आणि मनुके
- लाडू तयार करण्यासाठी तिरुपतीहून आचारी येणार 
- ऑस्ट्रेलियाहून राजा ब्रॅंडचे बेसन
- काश्‍मीरमधील पुलवामातून केशर

Edited  by : Mangesh Mahale  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com