डीएमकेची चेन्नई एक्सप्रेस; 16 पैकी 15 जागांवर आघाडी घेत अण्णाद्रमुकला धोबीपछाड - assembly Election DMK is leading in 15 constituencies of 16 in Chennai | Politics Marathi News - Sarkarnama

डीएमकेची चेन्नई एक्सप्रेस; 16 पैकी 15 जागांवर आघाडी घेत अण्णाद्रमुकला धोबीपछाड

वृत्तसंस्था
रविवार, 2 मे 2021

तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत. तर बहुमतासाठी 118 हा जादुई आकडा आहे.

चेन्नई : तमिळनाडूमध्ये सत्तांत्तर होण्याची शक्यता असून डीएमकेने सुरूवातीच्या कलांमध्ये बहुमत मिळवल्याचे दिसते. राज्याची राजधानी असलेल्या चेन्नईमध्ये डीएमकेने अण्णाद्रमुकला छोबीपछाड दिला आहे. येथील 16 विधानसभा मतदारसंघांपैकी 15 जागांवर डीएमकेने आघाडी घेतली आहे. अण्णाद्रमुकचे अनेक मंत्रीही पिछाडीवर आहेत. 

तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या एकूण 234 जागा आहेत. तर बहुमतासाठी 118 हा जादुई आकडा आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार द्रमुकने बहुमताचा आकडा पार करत मोठी आघाडी घेतली आहे. द्रमुकला 130 हून अधिक जागांवर आघाडी मिळाली असून अण्णाद्रमुकला अद्याप 90 चा आकडाही गाठता आलेला नाही.

राज्याची राजधानी असलेल्या चेन्नईमध्येही द्रमुकने मोठी आघाडी घेतली आहे. चेन्नईमध्ये एकूण 16 विधानसभा मतदारसंघ आहेत. तिथे द्रमुकला 15 जागा मिळताना दिसत आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागातही द्रमुकने मोठी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. अण्णाद्रमुकला मागील दहा वर्षांपासून असलेली सत्ता गमवावी लागण्याची चिन्हे आहेत. 

पुदुच्चेरीत भाजप आघाडीची सत्तेच्या दिशेने वाटचाल

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये भाजप आघाडीने सत्ता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. एकूण 30 विधानसभा मतदारसंघांपैकी 16 जागांवर भाजप आघाडीने सध्या आघाडी मिळवली आहे. तर केवळ 9 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे या राज्यांत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजपला यश मिळणार आहे. तर कर्नाटकनंतर दक्षिणेतील आणखी एका राज्यात भाजप सत्ता काबीज करणार आहे. 

पुदुच्चेरीमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुमत गेल्याने काँग्रेसला सत्ता सोडावी लागली. त्यामुळे काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य निसटले. पुदुच्चेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणुक झाली आहे. राज्यात तीन नामनिर्देशित सदस्य असतात. 2016 मध्ये काँग्रेसने 19 जागा जिंकल्या होत्या. तर एआयएडीएमके व एनआर काँग्रेस या पक्षांना प्रत्येकी 4 जागा मिळाल्या होत्या. 

भाजपचे तीन नामनिर्देशित सदस्य आहेत. एक्झिट पोलनुसार, पुदुच्चेरीत एनआर काँग्रेस-भाजप आघाडीला विजय मिळेल. या आघाडीला 18 जागा मिळतील. काँग्रेस आघाडीला 12 जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यानुसार सुरूवातीच्या मतमोजणीच्या कलांनुसार भाजप आघाडीला आतापर्यंत 16 जागांवर आघाडी मिळाली आहे. या राज्यात एनआर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता असून याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख