शहीद जवानांविषयी वादग्रस्त पोस्ट भोवली; लेखिकेवर देशद्रोहाचा गुन्हा - Assam writer sikha sarma arrested for sedition for comment on crpf jawans | Politics Marathi News - Sarkarnama

शहीद जवानांविषयी वादग्रस्त पोस्ट भोवली; लेखिकेवर देशद्रोहाचा गुन्हा

वृत्तसंस्था
बुधवार, 7 एप्रिल 2021

सीआरपीएफ जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 22 जवान शहीद झाले.

गुवाहाटी : छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यात 22 सीआरपीएफ जवान शहीद झाले आहेत. या जवानांविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट लिहिणे एका प्रसिध्द लेखिकेला चांगलेच महागात पडले आहे. या लेखिकेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला अटकही केली आहे.

शिखा शर्मा असे या लेखिकेचे नाव आहे. आसाममध्ये त्या प्रसिध्द आहेत. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील बीजापुरमध्ये सीआरपीएफ जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 22 जवान शहीद झाले. तर एका जवानाचे अपहरण करण्यात आले आहे. या हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असताना शर्मा यांनी याअनुषंगाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली.

हेही वाचा : लस देता का लस! राज्यात तुटवडा अन् केंद्राकडून कासवगतीने पुरवठा

‘’पगार घेणारे जे लोक ड्युटी करताना मरण पावतात त्यांना शहीद म्हणता येणार नाही. हेच लॅजिक लावायचे झाले तर विजेचा झटका बसून मृत्यू झालेल्या वीज विभागातील कर्मचाऱ्यांनाही शहीद म्हणावे लागेल. लोकांना भावनिक करू नका,’’ असे शर्मा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टनंतर त्यांच्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली. तसेच सामूहिक बलात्कार आणि हत्येची धमकी आल्याचा दावाही शर्मा यांनी केला होता.

या पोस्टवर शर्मा यांनी नंतर सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला. पण मंगळवारी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. उमी डेका बरुआ आणि कंगना गोस्वामी यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे याबाबत चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

माझ्या पोस्टचा चुकीच्या पध्दतीने अर्थ काढण्यात आला. माझा मानसिक छळ करणे, हा गुन्हा नाही का? माझ्या विरोधातील खोटा प्रचार कायद्याच्या अखत्यारीत येत नाही? मी हत्या आणि सामुहिक बलात्काराबाबत केलेल्या तक्रारीची आधी चौकशी का नाही झाली?, असे शिखा यांनी दुसऱ्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख