पक्षाचे संस्थापक अन् दोनवेळच्या मुख्यंमत्र्यांनाच दिला निवडणुकीतून डच्चू

नवीन पक्ष स्थापन करून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू झाल्याने भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
Assam gana parishad sidelines its founder prafulla kumar mahanta
Assam gana parishad sidelines its founder prafulla kumar mahanta

गुवाहाटी : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पारड्यात अधिकाधिक जागा पाडून घेण्यासाठी सर्वच पक्षांची चढाओढ लागली आहे. आसाममध्ये भाजपने आपल्या मित्रपक्षाचे संस्थापक आणि दोनवेळच्या मुख्यमंत्र्यांचाच मतदारसंघ मिळवला आहे. आतापर्यंत हा मतदारसंघ मित्रपक्षाकडेच होता. 

आसाममध्ये भाजपने आसाम गण परिषदेशी आघाडी केली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये यापूर्वीच जागावाटप झाले आहे. त्यानुसार भाजप 92, आसाम गण परिषद 26 आणि इतर मित्रपक्षांना 8 जागा देण्यात आल्या आहेत. आसाम विधानसभेच्या एकूण 126 जागा आहेत. आसाम गण परिषदेचे संस्थापक आणि दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रफुल्ला कुमार महंता यावेळी निवडणूक लढवू शकणार नाहीत.

पक्षाचे अध्यक्ष अतुल बोरा यांनी सांगितले की, महंता हे निवडणूकीत विजयी होण्याची शक्यता कमी आहे. तसेच त्यांची तब्बेतही साथ देत नाही. त्यामुळे बरहामपुर हा त्यांचा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ भाजपला देण्यात आला आहे. महंता या मतदारसंघातून सहावेळा निवडणुन आले आहेत. भाजपने या जागेवर जीतू गोस्वामी यांना उतरवले आहे.

आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना बोरा म्हणाले, विविध मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयी होण्याची शक्यता पडताळून पाहण्यात आली आहे. त्यानुसारच निर्णय घेण्यात आले आहेत. महंता यांच्याविषयी आम्हाला सन्मान आहे. त्यांना कमी लेखण्यासाठी नव्हे तर पक्षाला अधिक जागा मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे बोरा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

महंता होते सर्वात तरूण मुख्यमंत्री

महंता यांनी 1985 मध्ये पक्षाला विजय मिळवून दिला होता. त्यावेळी ते आसामचे सर्वात तरूण मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर सलग सहावेळा त्यांनी बरहामपुर मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी 2006 मध्ये पक्षातून बाहेर पडत आसाम गण परिषद (प्रोग्रेसिव) नावाने पक्ष स्थापन केला होता. त्यानंतरही त्यांचा विजय झाला होता. पण त्यानंतर ते पून्हा मूळ पक्षात गेले. 

स्वतंत्र पक्षाची तयारी

महंता यांना उमेदवारी न देण्यात आल्याने ते नाराज असल्याचे समजते. पुन्हा प्रोग्रेसिव पक्ष स्थापन करण्याचा त्यांचा विचार सुरू झाला आहे. असे झाल्यास याचा फटका भाजप आघाडीला बसू शकतो. दरम्यान, बोरा यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. महंता यांना नागरिकता संशोधन विधेयकाला नेहमीच विरोध राहिला आहे. त्यावरूनही पक्षात दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का बसू शकतो. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com