भाजपला धक्का; आणखी एका मित्रपक्षाने सोडली साथ...

केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तारखा शुक्रवारी जाहीर केल्या आहेत.
Assam bodoland peoples front sever ties with bjp
Assam bodoland peoples front sever ties with bjp

गुवाहाटी : केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपच्या एका मित्रपक्षाने साथ सोडली आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या मित्रपक्षाने आता काँग्रेसचा हात धरला असून आगामी निवडणूक काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीकडून लढण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक आयोगाने शुक्रवारी तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुद्दुच्चेरी या पाच राज्यातील निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या. या पाच राज्यांपैकी सध्या केवळ आसामध्ये भाजपची सत्ता आहे. 2016 मध्ये झालेल्या निवडणूकीत भाजपला 60 जागा मिळाल्या होत्या. तर भाजप आघाडीने 86 जागा जिंकून बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. 

2016 च्या निवडणुकीवेळी भाजपसोबत बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) आणि आसाम गण परिषद हे पक्ष होते. या पक्षांना अनुक्रमे 12 व 14 जागा मिळाल्या होत्या. यामधील बीपीएफने भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष हागरामा मोहिलारी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. ''शांती, एकता, आणि विकासाची कामे करण्यासाठी आगामी निवडणुकीत महाआघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता यापुढे भाजपासोबत आघाडी किंवा मैत्री करणार नाही,'' असे त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आसामचे अर्थमंत्री आणि भाजपच्या नेतृत्वाखालील नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्स (एनईडीए)चे संयोजक डॉ. हेमंत बिस्वा सरमा यांनी यापूर्वीच बीपीएफबाबत संकेत दिले होते. आगामी निवडणूकीत भाजप बीपीएफसोबत आघाडी करण्यास इच्छुक नसल्याचे त्यांनी म्हटले होते. बोडोलँड क्षेत्रीय परिषद (बीटीसी)चे मुख्य कार्यकारी सदस्य प्रमोद बोडो यांच्या नेतृत्वाखालील यूनाईटेड पीपल्स पार्टी लिबरल (यूपीपीएल) सोबत आघाडी केल्याची घोषणाही भाजपने केली आहे. 

दरम्यान, नुकत्याच झालेल्या बोडो क्षेत्रीय परिषदेच्या निवडणुकीत भाजपला 9 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपची साथ सोडलेल्या बीपीएफचे 17 उमेदवार विजयी झाले होते. तर यूपीपीएलने 12 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेस व गण शक्ती पार्टीला प्रत्येकी 1 जागा मिळाली. 

आसामध्ये तीन टप्प्यांत मतदान...

निवडणूक आयोगाने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आसामध्ये तीन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिलला मतदान होणार असून 2 मे रोजी पाचही राज्यांतील निकाल जाहीर केले जाणार आहेत. 

पाच राज्यातील निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे - 
पश्चिम बंगाल : जागा - 294, टप्पे - 8, टप्पा 1 - मतदान - 27 मार्च, टप्पा 2 - मतदान - 1 एप्रिल, टप्पा 3 - मतदान - 6 एप्रिल, टप्पा 4 - मतदान - 10 एप्रिल, टप्पा 5 - मतदान - 17 एप्रिल, टप्पा 6 - मतदान - 22 एप्रिल, टप्पा 7 - मतदान - 26 एप्रिल, टप्पा 8 - मतदान - 29 एप्रिल.
तमिळनाडू : जागा - 234, टप्पे - 1, मतदान - 6 एप्रिल.
केरळ : जागा - 140, टप्पे -1, मतदान - 6 एप्रिल.
आसाम : जागा - 126, टप्पे - 3, टप्पा 1 - मतदान - 27 मार्च, टप्पा 2 - मतदान - 1 एप्रिल, टप्पा 3 - मतदान - 6 एप्रिल.
पुदुच्चेरी : जागा - 30, टप्पे - 1, मतदान - 6 एप्रिल.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com