NRC मध्ये दुरूस्तीचे आश्वासन..आसामसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध - assam assembly election bjp leader jp nadda release manifesto free education | Politics Marathi News - Sarkarnama

NRC मध्ये दुरूस्तीचे आश्वासन..आसामसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मार्च 2021

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज आसाम विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

गुवाहाटी : आसाममधील सत्ता टिकविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आसाममध्ये प्रचारासाठी उतरले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज आसाम विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

आसामध्ये भाजप सत्तेवर आल्यास सरकारी शाळेतील प्रत्येक मुलाला विनामूल्य शिक्षण, आठवीनंतर विद्यार्थ्यांना सायकल भेट, पूरनियंत्रणासाठी उपाय करणे, आवश्यक वस्तूंबाबत राज्याला स्वावंलबी बनविणे आदी आश्वासनेही या जाहीरनाम्यात देण्यात आली आहेत. 

आसाममध्ये नागरिकांच्या नोंदणीमध्ये दुरुस्ती करण्याचे आश्वासनही या जाहीरनाम्यात भाजपने दिले आहे. सीमानिश्चितीच्या माध्यमातून जनतेच्या राजकीय हक्कांचे रक्षण करण्याच्या आश्वासनांसह जाहीरनाम्यात दहा प्रमुख आश्वासने देण्यात आली आहेत.

मोठी बातमी : 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार...

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी (एनआरसी) मोहिम राबविण्यात येत आहे. मूळ भारतीय नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करून सर्व बेकायदेशीर स्थलांतरितांची हाकालपट्टी करण्याचा या मोहिमेचा हेतू आहे. त्यसाठी, आसाममध्ये नागरिकांच्या नोंदणीमध्ये दुरुस्ती करण्याचे आश्वासनही या जाहीरनाम्यात दिले आहे. ‘ओरुंडोई’ योजनेतंर्गत महिलांना सध्या ८३० रुपये देण्यात येतात. ही रक्कम तीन हजार रुपये करण्याचे तसेच पात्र रहिवाशांना जमीन अधिकार बहाल करण्याचे आश्वासनही जाहीरनाम्यात आहे.

जाहीरनाम्याचे प्रकाशन केल्यानंतर जे.पी.नड्डा म्हणाले, की योग्य वेळ आल्यावर आसाममध्ये नागरिकत्व सुधारणा कायदाही (सीएए) लागू केला जाईल. मात्र, हा केंद्राचा कायदा असूनही काँग्रेस तो लागू करणार नसल्याचे बोलत आहे. काँग्रेस एकतर अज्ञानी आहे किंवा आसामधील जनतेचा मूर्ख बनवित आहे, असा आरोपही त्यांनी केला.

2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथील मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला. भाजपाल 126 पैकी 86 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 26 आणि इतर पक्षांना 14 जागा मिळाल्या. आसाममध्ये सत्ता टिकविण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार सुरू केला आहे. सीएएचा मुद्दा या निवडणुकीत महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख