पंडित नेहरुंना कमकुवत समजणाऱ्यांनी वाजपेयी, मोदींना सुद्धा तोच न्याय लावावा!

पंडितनेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी आहे.
Sarkarnama Banner - 2021-07-27T123149.498.jpg
Sarkarnama Banner - 2021-07-27T123149.498.jpg

मुंबई :  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Bhagat Singh Koshyari यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू Pandit Nehru यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन राजकारण पेटलं आहे. काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

अशोक चव्हाण म्हणाले की, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी आहे. त्यांनी दिलेले संदर्भ अर्धसत्य, अपूर्ण आणि वास्तविकतेचा विपर्यास करणारे आहेत. शांततेचे पुरस्कर्ते असणे याचा अर्थ कमकुवत असणे, असा होत नाही. तसे असेल तर मग संवाद आणि सौहार्दाचा संदेश देण्यासाठी लाहोरला 'सदा ए सरहद' बस घेऊन जाणारे अटलबिहारी वाजपेयी, पाकिस्तानात मोहम्मद अली जिना यांच्या कबरीला भेट देऊन वैचारिक कोलांटउडी घेणारे लालकृष्ण अडवाणी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसानिमित्त अनाहूतपणे लाहोरला जाऊन सद्भावनेचा संदेश देणाऱ्या नरेंद्र मोदींनाही कोश्यारी कमकुवत समजतात का? हा प्रश्न उपस्थित होतो. शांततेची अभिलाषा बाळगणाऱ्या नेहरुवर कमकुवतपणाचा ठपका ठेवला जात असेल तर वाजपेयी, अडवाणी आणि मोदींना सुद्धा तोच न्याय लावावा लागेल. 

वाजपेयी यांच्या पूर्वीची सरकारे राष्ट्रीय सुरक्षेबाबत गंभीर नव्हती, हा आरोप अत्यंत चुकीचा व देशाच्या अनेक माजी पंतप्रधानांचा अवमान करणारा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरू यांच्याच नेतृत्वाखाली अनेक संस्थाने विलीन झाली. आधुनिक, विज्ञाननिष्ठ भारताच्या स्वप्नाची मुहूर्तमेढही त्यांनीच रोवली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पायाभूत सुविधांची उभारणी व देशाचे परराष्ट्र धोरण ठरविण्यात पंडित नेहरू यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे, असे चव्हाण म्हणाले. 

चव्हाण म्हणाले, ''अमेरिका आणि रशिया सारख्या दोन महासत्तांमध्ये शीतयुद्ध सुरू असताना नासेर आणि टिटो यांना सोबत घेऊन उभी केलेली अलिप्ततावादी चळवळ हे एक प्रकारे नेहरु यांनी जागतिक महासत्तांना दिलेले आव्हान होते. लालबहादूर ‌शास्त्री यांच्या काळात भारताने लाहोरपर्यंत धडक दिली. इंदिरा गांधी यांच्या काळात पाकिस्तानचे दोन तुकडे झाले, सियाचिन ग्लेशियर ताब्यात घेण्यात आले. राजीव गांधी यांच्या काळात पंजाब व पूर्वोत्तर राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय झाले. चीन व पाकिस्तानच्या सिमेवर यशस्वी लष्करी मोहिम राबवल्या. दोषारोप करण्याचा हेतू नाही. मात्र ज्या कारगिल विजय दिनी राज्यपाल बोलत होते, ते कारगिल युद्ध आणि तत्पूर्वीची पाकिस्तानची घुसखोरी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात घडली, हा इतिहास विसरून चालणार नाही''

भारताच्या आण्विक सज्जतेची सुरुवात देखील पंडित नेहरू व होमी जहांगीर भाभा यांनी केली. जागतिक दबावाला भीक न घालता पोखरणचा पहिला अणुस्फोट इंदिरा गांधी यांच्या काळात झाला होता. वाजपेयी यांच्या काळात झालेल्या आण्विक चाचण्यांची संपूर्ण तयारी तत्पूर्वीच्या पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारच्या कार्यकाळात पूर्ण झाली होती. स्वतः डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्याविषयी जाहीर वक्तव्य केलेले आहे. या संपूर्ण वस्तुस्थितीकडे राज्यपालांचे कदाचित दुर्लक्ष झालेले दिसते आहे, असे चव्हाण म्हणाले. 

पंडित नेहरू यांच्याबद्दल राज्यपाल नक्की काय म्हणाले? 
मुंबई : कारगिल संघर्षांतील योध्दयांचा सत्कार करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नेहरू Pandit Nehru यांची शांतिदूत बनण्याची मनीषा देशाच्या सुरक्षेसाठी घातक ठरली असे मत मांडले. त्यावरून वाद पेटला आहे. कारगील विजय दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी Bhagat Singh Koshyari बोलत होते. 
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com