अर्णब गोस्वामींच्या अडचणीत वाढ : रिपब्लिक टीव्हीचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी 

रिपब्लिक टीव्हीचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी दूरचित्रवाणी वाहिन्यांची देशातील शिखर संस्था असलेल्या ‘आयबीएफ’कडे (Indian Broadcasting Federation) केली आहे.
Arnab Goswami.jpg
Arnab Goswami.jpg

नवी दिल्ली : अर्णब गोस्वामी व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरणाचा रिपब्लिक टीव्हीला चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. गोस्वामी व पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर एनबीएने (News Broadcasters Association) टीव्ही रेटिंगवरून ‘बार्क’वर ताशेरे ओढले आहेत.

त्याचबरोबर रिपब्लिक टीव्हीचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी दूरचित्रवाणी वाहिन्यांची देशातील शिखर संस्था असलेल्या ‘आयबीएफ’कडे (Indian Broadcasting Federation) केली आहे.

अर्णब गोस्वामी व बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रसारमाध्यमांवर व्हायरल झालं. या चॅटमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. गोस्वामी-दासगुप्ता यांच्यातील चॅटवर एनबीएने आश्चर्य व्यक्त केलं आहे.

चॅटसंदर्भात सविस्तर पत्रक एनबीएकडून प्रसिद्ध करण्यात आलं असून, रिपब्लिक वृत्तवाहिन्यांवर कारवाई करण्याच्या मागणीवर जोर देण्यात आला आहे. त्याचबरोबर वृत्तवाहिन्यांचं रेटिंग निश्चित करणाऱ्या ‘बार्क’च्या कार्यावर देखील ताशेरे ओढले आहेत.

इंडिया टीव्हीचे चेअरमन आणि मुख्य संपादक रजत शर्मा हे एनबीएचे अध्यक्ष आहेत. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यात मिलीभगत होती, असा आरोप एनबीएने केला आहे.”दासगुप्ता व गोस्वामी यांच्यातील हजारो व्हॉट्सअ‍ॅप चॅट बघून धक्काच बसला आहे.

या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून स्पष्ट दिसतंय की गोस्वामी व दासगुप्ता यांनी हातमिळवणी केली होती. रिपब्लिक टीव्हीची प्रेक्षक संख्या वाढवून दाखवण्यासाठी रेटिंगमध्ये हेराफेरी करण्यात आली. रिपब्लिक टीव्हीच्या फायद्यासाठी इतर वाहिन्यांचं रेटिंग कमी करण्यात आलं. त्याच्यासाठी दोघांमध्ये हातमिळवणी होती,” असं एनबीएनं म्हटलं आहे.

गोस्वामी व दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये काय? 

गोस्वामी व दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये “फक्त रेटिंगमध्येच नाही, तर सत्तेतही हस्तक्षेप करण्यात आल्याचं चॅटमधून समोर आलं आहे. दोघांमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून मंत्रिमंडळातील फेरबदल, पीएमओपर्यंत लागेबांधे आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या कामाबद्दलही उल्लेख करण्यात आलेला आहे.

मागील चार वर्षांपासून एनबीएकडून करण्यात येत असलेल्या आरोपांनाच दुजोरा देतं. बार्कच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लागेबांधे लावून एनबीए सदस्य नसलेल्या वाहिनीकडून रेटिंगमध्ये हेराफेरी केली जात आहे. त्यामुळे रिपब्लिक टीव्हीचे रेटिंग न्यायालयाचा निकाल येईपर्यंत थांबवण्यात यावं, अशी सूचना एनबीएनं बार्कला केली आहे. त्याचबरोबर आयबीएफकडे रिपब्लिकचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे.

अर्णव गोस्वामींना बालाकोट, पुलवामाबद्दल पूर्वकल्पना कशी?

रिपब्लिक माध्यम समूहाचे संपादक अर्णव गोस्वामी यांना बालाकोट अन्‌ पुलवामा या संवेदनशील विषयांची माहिती कशी होती, याची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी मंगळवारी  बैठक होत आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

‘बार्क’चे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता आणि गोस्वामी यांच्यामधील व्हॉट्सॲपचे ५०० पानांचे चॅट पुढे आले असल्याने त्याबद्दल चौकशी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, आल्ट न्यूजचे सहसंस्थापक प्रतीक सिन्हा यांनी यापूर्वी दासगुप्ता आणि गोस्वामी यांच्यातील कथित चॅटबद्दलचा दावा केला होता. व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉटदेखील त्यांनी समाज माध्यमांत शेअर केले आहेत. सिन्हा यांनी शेअर केलेल्या चॅटमध्ये गोस्वामींनी हवाई हल्ला करून निवडणुका जिंकण्यात येतील, असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनीही पुलवामामध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर गोस्वामी यांनी आनंद व्यक्त केला होता, असा आरोप केला आहे.

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com