अमित शहा नेपाळ अन् श्रीलंकेतही भाजपची सत्ता आणणार... - Amit Shah said we will form governments in Nepal and Sri Lanka says biplav dev | Politics Marathi News - Sarkarnama

अमित शहा नेपाळ अन् श्रीलंकेतही भाजपची सत्ता आणणार...

वृत्तसंस्था
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

सतत वादग्रस्त वक्तव्य करून वाद निर्माण करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

अगरतळा : सतत वादग्रस्त वक्तव्य करून वाद निर्माण करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. गृहमंत्री अमित शहा यांची नेपाळ आणि श्रीलंकेत भाजपचे सरकार आणण्याचे नियोजन असल्याचे अजब वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधी पक्षांकडून टीका होऊ लागली आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर बिप्लव देव यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यावेळी त्यांनी थेट आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयी टिप्पणी केली. अगरतळा येथील भाजपच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांना २०१८ मध्ये झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान झालेल्या चर्चेची माहिती दिली. 

हेही वाचा : विजय मल्ल्याचा बंगला खरेदी करणाऱ्या अभिनेत्याला ईडीकडून अटक

ते म्हणाले, ''अमित शहा हे भाजपचे अध्यक्ष असताना अनेक राज्यांमध्ये अनेक राज्यांमध्ये पक्षाने सत्ता मिळविली. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या विदेशातील विस्तारावरही चर्चा केली होती. भाजपचे उत्तर-पूर्व झोनल सचिव अजय जमवाल म्हणाले होते की, भाजपाने अनेक राज्यांत सत्ता मिळविली आहे. त्यांना उत्तर देताना अमित शहा म्हणाले, अजून श्रीलंका आणि नेपाळ बाकी आहे. आपल्याला श्रीलंका आणि नेपाळमध्ये सत्ता आणण्यासाठी पक्षाचा विस्तार करायचा आहे,'' असा दावा देव यांनी केला आहे.  

देव पुढे म्हणाले की, ''देशात २०१४ मध्ये एनडीएची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सार्कची देशांची बैठक बोलावली होती. त्यामध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांचाही समावेश होता. कारण भारताला शेजारील देशांसोबत पुढे जायचे होते.'' देव यांच्या या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी टीका सुरू केली आहे.

देव यांचे हे वक्तव्य शेजारील देशांच्या विरोधातील या वक्तव्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस व डाव्या पक्षांनी केली आहे. शहा यांचे नेपाळ आणि श्रीलंकामध्ये सत्ता स्थापन करण्याचे नियोजन असेल आणि मुख्यमंत्र्यांनी हे नियोजन जाहीर करणे यावरून मोदी सरकारची मनोवृत्ती दिसून येते. इतर देशांतील अंतर्गत मुद्यांमध्ये ढवळाढवळ करणे योग्य नाही. आपल्या विदेशी धोरणांनाही धक्का देणारे हे विधान असल्याची टीका माजी मंत्री बादल चौधरी यांनी केली आहे. 

मागील वर्षी देव यांनी हरियाणातील लोकांविषयी वादग्रस्त विधान केले होते. हरियाणातील जाट बुध्दिमान नसतात पण शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात. त्यांच्यातील बुध्दीमानी लोक बंगालींचा सामना करू शकत नाहीत, असे ते म्हणाले होते. याबाबतचा व्हिडिओ काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केल्यानंतर देव यांच्याविरोधात मोठा रोष निर्माण झाला होता. त्यानंतर देव यांनी माफीही मागितली होती.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख