मोदी सरकारनं मुख्य सचिवांची निवृत्तीच्या दिवशीच केली होती बदली

केंद्र सरकारचा आदेश धुडकावत मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना पदमुक्त केलं नाही.
Alapan Bandyopadyay retires as a chief secretary of West Bengal
Alapan Bandyopadyay retires as a chief secretary of West Bengal

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल चे मुख्य सचिव अल्पन बंदोपाध्याय हे आज ( ता. ३१ मे ) सेवेतून निवृत्त झाले आहेत. मोदी सरकारने त्यांची बदली करत आजच दिल्लीतील केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (डीओपीटी) येथे सकाळी १० वाजता हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंदोपाध्याय यांना पदमुक्त केलं नाही. त्यामुळे ते बंगालच्या मुख्य सचिव पदावरूनच निवृत्त झाले. (Alapan Bandyopadyay retires as a chief secretary of West Bengal)

पश्चिम बंगालला यास चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठवड्यात बंगालचा दौरा केला. यावेळी आयोजित आढावा बैठकीत ममतांसह मुख्य सचिव अर्धा तास उशिराने दाखल झाले. यावरून मोठे राजकारण सुरू झाले. पंतप्रधानांचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला. तर ममतांसह तृणमूलच्या नेत्यांनीही त्यावर पलटवार केला. 

या घटनाक्रमानंतर केंद्र सरकारने बंदोपाध्याय यांच्या केंद्रात प्रतिनियुक्तीचा आदेश काढला. राज्य सरकारला पत्र पाठवत त्यांना मुख्य सचिव पदावरून मुक्त करण्यास सांगितले. केंद्रीय कार्मिक आणि प्रशिक्षण विभागामध्ये त्यांना सोमवारी सकाळी हजर राहण्यास सांगितले होते. वास्तविक ते आजच निवृत्ती होणार होते. त्यानंतरही केंद्र सरकारने त्यांची बदली केल्याने ममतांनी जोरदार टीकाही केली. तसेच पंतप्रधानांना हा आदेश मागे घेण्याची विनंती करणारे पत्रही पाठवले. पण त्यावर अखेरपर्यंत निर्णय झालाच नाही.

बंदोपाध्याय आज दिल्लीत जाऊन नवीन पदभार स्वीकारणार का, याबाबत उत्सुकता होती. पण ममतांनी त्यांना पदमुक्त न केल्याने ते बंगालच्या विधानभवनात मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहिले. कोरोना व चक्रीवादळाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. दिवसभराचे कामकाज केल्यानंतर बंदोपाध्याय आज निवृत्त झाले. 

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, अल्पन बंदोपाध्याय यांच्या बदलीचा आदेश बेकायदेशीर आहे. राज्यातील सध्याच्या परिस्थितीत त्यांची बदली करू नये. हा आदेश मागे घ्यावा. अशा आदेशांमुळे अधिकाऱ्यांच्या नैतिक मुल्यांवर आघात केला जात आहे, अशी टीका ममतांनी केली होती. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com