अकाली दल मोदी सरकारमधून बाहेर : हरसिमरत कौर बादलांचा मंत्रिपदाचा राजीनामा 

शिवसेनेने भाजप आघाडीला टाटा केल्यानंतर सत्तारूढ आघाडीतील कथित एकाधिकारशाहीला मिळालेला हा दुसरा धक्का मानला जातो.
Akali Dal out of Modi government: Harsimrat Kaur Badal resigns Cabenet minister
Akali Dal out of Modi government: Harsimrat Kaur Badal resigns Cabenet minister

नवी दिल्ली : शेतकऱ्यासंदर्भातील वादग्रस्त विधेयक चौफेर विरोधाला न जुमानता मोदी सरकारने लोकसभेत पुढे रेटल्यानंतर संतप्त झालेला भारतीय जनता पक्षाचा सर्वांत जुना मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचे अस्त्र उगारले आहे.

अकाली दलाच्या केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आज (ता. 17 सप्टेंबर) रात्री मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविल्याचे वृत्त आहे. अकाली दलाने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेनंतर सर्वांत विश्‍वासू मित्रपक्ष लांब जाण्याचा धोका भाजपवर येण्याची चिन्हे आहेत. 

प्रकाशसिंग आणि सुखबीरसिंग या बादल पिता पुत्रांचे अकाली दल मोदी सरकारमधून बाहेर पडले असले तरी भाजप आघाडी मात्र या पक्षाने अद्याप सोडलेली नाही. एका वृत्तानुसार, सरकारला आपला पक्ष बाहेरून पाठिंबा देत राहील, असे बादल यांनी रात्री स्पष्ट केले आहे. 

शिवसेनेने भाजप आघाडीला टाटा केल्यानंतर सत्तारूढ आघाडीतील कथित एकाधिकारशाहीला मिळालेला हा दुसरा धक्का मानला जातो. अकाली दल हा शिवसेनेच्या नंतरचा भाजप आघाडीतला दुसरा जुना घटकपक्ष आहे. भाजपचे केंद्रातील अजस्त्र बहुमत पाहता अकाली दलाचे 5-6 खासदार विरोधात गेल्याने महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यात संसदेत सरकारला काहीही अडचण नाही. मात्र, अकाली दलाने सरकारमधून बाहेर पडणे याचा राजकीयदृष्ट्या आणि बिहार निवडणुकीच्या तोंडावर कोणता "मेसेज' जाईल, हा भाजप नेतृत्वासाठी चिंतनाचा मुद्दा ठरावा असे राजकीय जाणकार म्हणतात. 

कृषी क्षेत्रात खासगी उद्योगांना मुक्तद्वार देण्यासह, 1955 चा आवश्‍यक वस्तू अधिनियम कायदा दुरुस्ती विधेयक आणि अन्य एक कृषीविषयक अशी तीन विधेयके सरकारने संसदेत मंजुरीसाठी आणली आहेत. यातील एक अध्यादेश आहे आणि त्याला याच अधिवेशनात मंजुरी मिळवणे घटनात्मकदृष्ट्या अपरिहार्य आहे. 

या विधेयकांना देशभरातून शेतकऱ्यांमधून विरोध होतो आहे. विशेषतः हरियाणा आणि पंजाबमध्ये या विरोधाची धार तीव्र आहे आणि त्याकडे दुर्लक्षित करणे अकाली दलाला राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही.

संसदेत अकाली दलाने आज याला विरोध करून पाहिला. मात्र सरकारने एक विधेयक आज लोकसभेत पुढे रेटले आणि राज्यसभेतही सरकारच्या त्याच हालचाली आहेत. लोकसभेत विधेयकाला मंजुरी मिळताक्षणी अस्वस्थ झालेल्या अकाली नेत्यांची तातडीची बैठक संध्याकाळी झाली त्यानंतर हरसिमरत कौर यांनी रात्री पंतप्रधान कार्यालयाकडे आपला राजीनामा पाठवून दिला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com