शेतकऱ्यांनो परत जा; दिल्लीत स्थानिक उतरले रस्त्यावर

आज अनेक स्थानिकांनी शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर जमा होत आंदोलनाविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
After Farmers protest Locals took to the streets in Delhi
After Farmers protest Locals took to the streets in Delhi

नवी दिल्ली  : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्चादरम्यान दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर आता स्थानिक नागरिक शेतकऱ्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आज अनेक स्थानिकांनी शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर जमा होत आंदोलनाविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे सीमेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिल्लीत बुधवारी मोर्चादरम्यान अनेक भागात हिंसाचार उफाळून आला. पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड, पोलिसांना मारहाण, त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याच्या घटना घडल्या. तसेच लाल किल्ल्यावर शेतकरी संघटनाचा ध्वज फडकावण्यात आला. पोलिसांनीही लाठीमार व अश्रृधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. या हिंसाचारानंतर दिल्लीतील स्थिती आज पुर्ववत झाली आहे. तसेच शेतकरीही सुमारे दोन महिने सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी गेले आहेत. 

पण हिंसाचारानंतर स्थानिक लोक शेतकरी आंदोलनाला विरोध करू लागले आहेत. शेकडो लोक हातात तिरंगा घेऊन व घोषणाबाजी देत सिंघू सीमेवर जमा झाले आहेत. मोर्चादरम्यान तिरंग्याचा अपमान करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी त्यांचे आंदोलन मागे घ्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी त्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहचू दिले नाही. हिंसाचारानंतर पोलिसांनी आंदोलनाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. 

दरम्यान, हिंसाचारानंतर पोलिसांनी विविध पोलिस स्टेशनमध्ये शेतकरी नेते व आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या हिंसाचारात जवळपास 300 पोलिस जखमी झाले आहेत. तसेच ट्रॅक्टरच्या अपघातात एका आंदोलकाचाही मृत्यू झाला आहे. सुमारे 30 हून अधिक शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. 

शेतकरी आंदोलनात फूट...

कृषी कायद्यांविरोधातील मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात फूट पडली आहे. ट्रॅक्टर मोर्चादरम्यान दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर दोन शेतकरी संघटनांनी आंदोलनातून माघार घेतल्याचे काल जाहीर केले. भारतीय किसान यूनियन (भानु)चे अध्यक्ष ठाकुर भानु प्रताप सिंह यांनी हिंसाचारामुळे आंदोलनातून बाहेर पडत असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, ''प्रजासत्ताक दिनी दिल्लीत घडलेल्या घटनांमुळे खुप दु:ख झाले आहे. त्यामुळे आमची संघटना आंदोलन संपवत आहे.'' या संघटनेतील शेतकरी नोएडा-दिल्ली मार्गावरील चिल्ला सीमेवर आंदोलन करत होते. अॉल इंडिया किसान संघर्ष समन्वय समितीचे वी. एम. सिंह यांनीही आंदोलनातून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट केले. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com