अण्णाद्रमुक-भाजपला धक्का; अभिनेता विजयकांतच्या पक्षाने सोडली साथ

विधानसभा निवडणुकीच्या महिनाभर आधीच तमिळनाडूतील अण्णा द्रमुक व भाजप आघाडीला जोरदार झटका बसला आहे.
Actor Vijayakanths DMDK Quits AIADMK BJP Alliance
Actor Vijayakanths DMDK Quits AIADMK BJP Alliance

चेन्नई : विधानसभा निवडणुकीच्या महिनाभर आधीच तमिळनाडूतील अण्णाद्रमुक व भाजप आघाडीला जोरदार झटका बसला आहे. अभिनेते विजयकांत यांच्या डीएमडीके या पक्षाने आघाडीची साथ सोडली आहे. अपेक्षित जागा न मिळाल्याने नाराज झालेल्या विजयकांत यांनी आघाडी न करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

तमिळनाडूमध्ये १८ एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत अण्णाद्रमुक व भाजपची आघाडी झाली आहे. या आघाडीत भाजपच्या वाट्याला केवळ २० जागा आल्या आहेत. अभिनेते विजयकांत यांच्या डीएमडीके या पक्षाशीही जागावाटपबाबत चर्चा सुरू होती. पण एआयडीएमकेने विजयकांत यांची मागणी मान्य केली नाही. त्यांनी अवास्तव जागा मागितल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. त्यामुळे विजयकांत यांनी आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

तमिळनाडूमध्ये २०१४ च्या निवडणुकीत एआयडीएमकेने ३९ पैकी ३७ जागा जिंकल्या होत्या. त्यांना ४४.३ टक्के मते मिळाली होती. तर विजयकांत यांच्या पक्षाला या निवडणुकीत खातेही खोलता आले नाही. त्यांना मिळालेली मते केवळ ५.१ टक्के एवढी होती. पण आगामी विधानसभा निवडणुकीत मतांची ही टक्केवारीही एआयडीएमकेसाठी महागडी ठरू शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे आता विजयकांत नेमकी काय भूमिका घेणार, याकडे नेत्यांचे लक्ष लागले आहे.

विजयकांत यांचा डीएमडीके पक्ष हा अण्णाद्रमुकचा सहकारी पक्ष होता. विजयकांत यांची प्रकृती बरी नसल्याने पक्षाची धुरा त्यांच्या पत्नी व पक्षाच्या खजिनदार प्रेमलता विजयकांत सांभाळत आहेत. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्ती शशिकलांचे राज्यात पाऊल पडताच डीएमडीकेने अण्णाद्रमुकची साथ सोडण्याचा इशारा दिला होता. पक्षाने स्वबळावर निवडणूक लढल्यास 10 ते 15 टक्के मते मिळतील, असा दावाही करण्यात  आला आहे. काही दिवसांपूर्वी प्रेमलता यांनी शशिकलांचे जाहीर कौतुक केले होते. 

पक्षाच्या मेळाव्यात बोलताना प्रेमलता विजयकांत म्हणाल्या होत्या की, ''राज्यातील सर्व 234 विधानसभा मतदारसंघात स्वबळावर लढणे डीएमडीकेसाठी मोठी बाब नाही. सर्व मतदारसंघात आम्ही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कॅप्टन विजयकांत अण्णाद्रमुकशी आघाडीचा निर्णय घेण्यास एक सेकंदापेक्षाही कमी वेळ लावतील. मात्र, ते आघाडी धर्माचे पालन करीत आहेत. परंतु, आमच्या सहनशीलतेलाही अंत आहे.''

Edited By Rajanand More
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com