भीषण स्थिती...24 तासात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना मृत्यू !  - 84.5 pc of new COVID-19 cases reported from 8 states in last 24 hours in India | Politics Marathi News - Sarkarnama

भीषण स्थिती...24 तासात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना मृत्यू ! 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 29 मार्च 2021

गेल्या 24 तासात महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू व छत्तीसगड या राज्यांमध्ये मिळून तब्बल 84.5 टक्के नवे कोरोना बाधित आढळले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली.

नवी दिल्ली: देशातील 8 राज्यांमधील कोरोनाची स्थिती गंभीर बनली असून धक्कादायक बाब म्हणजे या यादीत महाराष्ट्राचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. गेल्या 24 तासात महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू व छत्तीसगड या राज्यांमध्ये मिळून तब्बल 84.5 टक्के नवे कोरोना बाधित आढळले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. गेल्या 24 तासात भारतात 68 हजार 20 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून धक्कादायक बाब म्हणजे यात महाराष्ट्रातील तब्बल 40 हजार 414 रुग्णांचा समावेश असून राज्य प्रथम क्रमांकावर आहे. गेल्या 24 तासात देशात 291 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील 109 जणांचा यामध्ये समावेश आहे. 

तर कर्नाटकात 3 हजार 82 व पंजाबमध्ये 2 हजार 870 नव्या रुग्णांची नोंद गेल्या 24 तासात झाली. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्र लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर असून नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन न केल्यास व रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिल्यास लाॅकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात येते. देशातील 80 टक्के कोरोना रुग्णांची नोंद महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक व छत्तीसगड या पाच राज्यांमध्ये झाली असून कोरोनाचा महाविस्फोट झाल्यासारखीच परिस्थिती असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

दरम्यान, 24 तासात महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतातील लसीकरणाचा आकडा 6 कोटींपार गेला असून महाराष्ट्रासह 7 राज्यात यातील 60 टक्के लसी देण्यात आल्या आहेत. देशातील लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरूवात झाली असून दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला. तर येत्या 1 एप्रिलपासून 45 वर्षांपुढील नागरिकांना लस देण्यास सुरूवात होणार आहे.      

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख