उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये वीज पडल्याने ६१ जणांचा मृत्यू     - 61 killed in lightning strike in Uttar Pradesh and Rajasthan | Politics Marathi News - Sarkarnama

उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये वीज पडल्याने ६१ जणांचा मृत्यू    

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जुलै 2021

या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि राजस्थानमध्ये (Rajasthan) रविवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून तब्बल ६१ जणांचा मृत्यू झाला. समोर आलेल्या माहितीनुसार वीज पडल्याने उत्तर प्रदेशमधील ४१ जणांचा प्राण गेला. यामध्ये प्रयागराजमध्ये १४, कानपूर देहातमध्ये पाच तर कौशंबीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणेने फिरोझाबाद आणि उन्नाव तसेच चित्रकूटमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. (61 killed in lightning strike in Uttar Pradesh and Rajasthan) 

तसचे राजस्थानमध्येही वीज पडल्याने २० जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू एकट्या जयपूरमध्ये झाला. रविवारी राज्यातील वेगवगळ्या भागांमध्ये वीज पडल्याच्या घटनांमध्ये १७ जण जखमी झाले आहेत. जयपूर, ढोलपूर, कोट्टा आणि जहालवार जिल्ह्यांमध्ये काल मान्सूनचे दमदार आगमन झाले. त्यावेळी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.

या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की राजस्थानमधील काही भागात वीज कोसळल्याने अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहे. या घटनेमुळे दुःख झाले आहे. मृतांच्या कुटुंबीयांबद्दल मी तीव्र संवेदना व्यक्त करतो.

उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत प्रशासनाने करावी आणि योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे गाझीपूर, फिरोझाबाद, बलियामध्ये लोक वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

हेही वाचा : राज ठाकरे म्हणाले; राज्यात केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग सुरु आहे

राजस्थानमधील आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. याचदरम्यान अंबर किल्ल्याजवळ वीज पडल्याची घटना घडली. त्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला व १२ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केले.

शेळ्या चरायला गेलेल्या चार मुलांबरोबर जहालवारमधील एका तरुणाचाही वीज पडल्याने मृत्यू झाला. ढोलपूरमधील बारी परिसरातील तीन मुलांचा वीजपडून मृत्यू झाला. राजस्थानमध्ये घडलेल्या घटनांसंदर्भात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विटरवरुन शोक व्यक्त केला आहे. गेहलोत यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींनाही मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Edited By - Amol Jaybhaye 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख