पुणेकर दातेंनी चमकावले डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोळ्यासमोर तारे  - Shirish Date from Pune shines stars in front of Donald Trump's eyes | Politics Marathi News - Sarkarnama

पुणेकर दातेंनी चमकावले डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोळ्यासमोर तारे 

वृत्तसंस्था
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

मूळचे पुण्याचे असलेले शिरीष दाते यांनी अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना असा काही प्रश्‍न विचारला की क्षणभर त्यांच्या डोळ्यासमोर तारेच चमकले. "अमेरिकन जनतेबरोबर तुम्ही जे खोटं बोललात, त्याबद्दल तुम्हाला पश्‍चाताप वाटतो का?' असा शिरीष दाते यांचा प्रश्न होता. त्यावर काही सेकंद विचार करून ट्रम्प यांनी शिताफीने हा अडचणीचा प्रश्न टाळून ते दुसऱ्या प्रश्नाकडे वळले. 

वॉशिंग्टन : मूळचे पुण्याचे असलेले शिरीष दाते यांनी अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना असा काही प्रश्‍न विचारला की क्षणभर त्यांच्या डोळ्यासमोर तारेच चमकले. "अमेरिकन जनतेबरोबर तुम्ही जे खोटं बोललात, त्याबद्दल तुम्हाला पश्‍चाताप वाटतो का?' असा शिरीष दाते यांचा प्रश्न होता. त्यावर काही सेकंद विचार करून ट्रम्प यांनी शिताफीने हा अडचणीचा प्रश्न टाळून ते दुसऱ्या प्रश्नाकडे वळले. 

पुणेकर शिरीष दाते यांनी असा अडचणीचा प्रश्न विचारुन सर्वांनाच धक्का दिला. व्हाइट हाऊसच्या पत्रकार कक्षात त्या वेळी उपस्थित असलेले सगळेच जण काही क्षणासाठी दाते यांच्या या प्रश्नाने अवाक झाले होते.

भारतीय-अमेरिकन वंशाचे शिरीष दाते मूळचे पुणेकर आहेत. त्यांचा जन्म पुण्यामध्ये झाला आहे. व्हाइट हाऊसचे प्रतिनिधी म्हणून ते हफिंगटन पोस्टसाठी काम करतात. "मिस्टर प्रेसिडंट आज तीन-साडेतीन वर्षांनंतर, अमेरिकन जनतेशी तुम्ही जे खोटं बोललात, त्याबद्दल तुम्हाला पश्‍चाताप वाटतो का?' असा प्रश्न दाते यांनी विचारला होता. त्यांचा हा प्रश्न राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्रचंड अडचणीचा ठरला. 

शिरीष दाते कोण आहेत? 

वॉशिंग्टनमध्ये राहत असलेले शिरीष दाते मागच्या 25 वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. त्यांच्या लिंकडिन प्रोफाइलनुसार अमेरिकेतील एनपीआर आणि एपी या माध्यमांसाठी त्यांनी काम केले आहे. पॉलिटिकल सायन्स या विषयात दाते यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठामधून पदवी घेतली आहे. "ऑरबिट' नावाचे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे, असे सीएनबीसी टीव्ही 18 च्या वृत्तात म्हटले आहे. 

"मागच्या पाच वर्षांपासून मला ट्रम्प यांना हा प्रश्न विचारायचा होता,' असे ट्विट व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषद झाल्यानंतर दाते यांनी केले आहे. ट्रम्प यांना जो प्रश्न विचारला, त्याबद्दल ट्रम्प यांच्या विरोधकांकडून दाते यांचे समर्थन करण्यात येत आहे. 

शिरीष दाते यांनी "मिस्टर प्रेसिडंट आज तीन-साडेतीन वर्षांनंतर, अमेरिकन जनतेशी तुम्ही जे खोटं बोललात, त्याबद्दल तुम्हाला पश्‍चाताप वाटतो का?' असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर ट्रम्प किंचित अस्वस्थ झाले. त्यांनी प्रश्न पुन्हा विचारायला सांगितला. त्यानंतरही दाते यांनी पुन्हा तोच प्रश्न केला. पण, ट्रम्प यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता ते दुसऱ्या प्रश्नाकडे वळले.

हा प्रसंग ट्रम्प यांच्यासाठी अजिबात धक्कादायक नव्हता. कारण, व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदांमध्ये ट्रम्प यांचा यापूर्वी पत्रकारांबरोबर अनेकदा वाद झाला आहे. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख