दिल्लीकर शाहनवाज हुसेन बनणार भाजपचा बिहारमधील चेहरा

काश्‍मीरमध्ये भाजपचा जोरदार प्रचार करणारे हुसेन यांना दिल्लीतून हलविणे, बिहारमधील सुशील मोदी काळातील गटातटाच्या राजकारणावर थेट दिल्लीतील चेहरा नेमून इलाज करणे व बिहारमध्ये विस्ताराच्या भूमिकेत शिरलेले एमआयएमचे असदुद्दिन ओवैसी यांना लगाम घालणे हे काही ठळक इशारे भाजप नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना दिल्याचे स्पष्ट आहे.
Shahnawaj Hussain
Shahnawaj Hussain

नवी दिल्ली : गेली किमान दोन दशके राष्ट्रीय राजकारणात, त्यातही दिल्लीतच रमलेले व भाजपच्या शक्तीशाली केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य व राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांचे पुनर्वसन करताना सर्वेसर्वा भाजप नेतृत्वाने त्यांची बिहारमध्ये बदली करून अनेक दूरगामी मेसेज दिल्याचे जाणकार मानतात. 

काश्‍मीरमध्ये भाजपचा जोरदार प्रचार करणारे हुसेन यांना दिल्लीतून हलविणे, बिहारमधील सुशील मोदी काळातील गटातटाच्या राजकारणावर थेट दिल्लीतील चेहरा नेमून इलाज करणे व बिहारमध्ये विस्ताराच्या भूमिकेत शिरलेले एमआयएमचे असदुद्दिन ओवैसी यांना लगाम घालणे हे काही ठळक इशारे भाजप नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना दिल्याचे स्पष्ट आहे. हुसेन यांनी उमेदवारी अर्ज भरल्याभरल्या नितीशकुमार मंत्रिमंडळाचा लटकलेला विस्तार लगेचच होणार, अशी वार्ता येणे हेही विलक्षण सूचक आहे.

बिहारमध्ये नितीशकुमार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असले तरी भाजप आता 'मोठ्या भावाच्या' भूमिकेत आहे. नितीशकुमार यांच्याशी ट्युनिंग जुळेलेले माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना दिल्लीत हलविण्याचे 'कठीण लक्ष्य' साध्य केल्यावर भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने हुसेन यांना त्यांच्याच विधान परिषद जागेवरून बिहारमध्ये पाठवून त्या राज्यातील पक्षसूत्रे यापुढे कोणाकडे असणार याचेही संकेत मोदींच्या व इतरही गटांना दिले आहेत. 

किशनगंज व भागलपूरमधून लोकसभेवर निवडून येणारे हुसेन हे १९९० च्या दशकापासून दिल्लीतच रमले होते. अटलबिहारी वाजपेयी मंत्रिमंडळातील ते सर्वांत युवा मंत्री होते. कितीही आक्रमक प्रश्‍न विचारला तरी चढ्या आवाजात न बोलणारे भाजपचे जे मोजके प्रवक्ते आहेत त्यात त्यांचे नाव अग्रभागी आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित पराभव व २०१९ मधे तर तिकीटच नाकारल्यानंतरही त्यांना दिल्ली सोडायची नव्हतीच. मात्र तब्बल सुमारे ७ वर्षे स्वपक्षात सायडिंगला पडल्यावरही विविध वाहिन्यांवर पक्षाची बाजू सातत्याने लावून धरणे ही त्यांची जमेची बाजू ठरली. अ

लीकडे काश्‍मीर पंचायतीच्या निवडणुकीतही हुसेन यांनी जोरदार प्रचार करून भाजपच्या जागा काश्‍मीर खोऱ्यातून निवडून आणल्या त्याचीही बक्षिशी पक्षनेतृत्वाने त्यांना दिल्याचे मानले जाते. हुसेन यांना बिहारमध्ये हलवून भाजपने दूरगामी डाव टाकला आहे. सीमांचलात पहिल्या फटक्‍यात पाच आमदार निवडून आणणारे ओवैसी भाजपसाठी 'मदतनीसा' ची भूमिका वठवतात हे सत्य असले तरी त्यांना आताच रोखण्याची गरज असल्याचेही मत भाजपमध्ये व्यक्त होते.

त्यामुळे जेथे ओवैसी यांनी मुसंडी मारली त्याच भागातून येणारे हुसेन यांच्या निमित्ताने ओवैसींना रोखण्याबरोबरच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावरही अप्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न यानिमित्ताने भाजप करत असल्याचे चित्र आहे. हुसेन पहिल्यांदा व नंतरही जेथून निवडून येत होते त्याच सीमांचल भागात ओवैसी यांनी अलीकडे मुसंडी मारली. या स्थितीत त्यांना रोखण्यासाठी भाजप नेतृत्वाने हुसेन यांच्या नावाने नवा पत्ता फेकला आहे. यानिमित्ताने मुस्लिम समाजात सकारात्मक संदेश जाईल व बिहारमध्ये भाजप आघाडीलाही मजबुती येईल असा भाजप नेतृत्वाचा होरा आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com