आझादांना निरोप देताना पंतप्रधान मोदी झाले भावूक

राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाल संपुष्टात येत आहे. गुलाम नबी आझाद, महंमद फैयाज, शमशेर सिंग आणि नझीर अहमद लावाय असे हे चार सदस्य असून हे चारही सदस्य जम्मू आणि काश्मीरमधून निवडून आले आहेत. आज त्यांना राज्यसभेत निरोप देण्यात आला​
Narendra Modi - Gulam Nabi Azad
Narendra Modi - Gulam Nabi Azad

नवी दिल्ली : राज्यसभेतून निवृत्त होत असलेले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या निरोपाचे भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भावूक झाले होते. गुजरातच्या पर्यटकांवर काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर आझाद यांनी जी मदत केली व ज्या संवेदना दाखवल्या त्याची आठवण काढत असताना पंतप्रधानांचा आवाज भरुन आला होता. 

राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाल संपुष्टात येत आहे. गुलाम नबी आझाद, महंमद फैयाज, शमशेर सिंग आणि नझीर अहमद लावाय असे हे चार सदस्य असून हे चारही सदस्य जम्मू आणि काश्मीरमधून निवडून आले आहेत. आज त्यांना राज्यसभेत निरोप देण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आझाद यांना शुभेच्छा दिल्या. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाल संपुष्टात येत असून एवढ्या सक्षम नेत्याची जागा कोण घेऊ शकेल, याबद्दल माझ्या मनात शंका आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझाद यांचा गौरव केला.

आझाद यांच्याबद्दलची आठवण सांगताना ते म्हणाले, "काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात गुजरातचे आठ पर्यटक ठार झाले होते. त्यावेळी मला पहिला फोन आला तो गुलाम नबी आझादांचा. केवळ माहिती देण्यासाठी तो नव्हता, तर त्यांच्या आवाजात एखाद्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे काळजीही डोकवत होती. ते फोनवर बोलत असताना अश्रू आवरु शकत नव्हते. त्यावेळी प्रणव मुखर्जी संरक्षण मंत्री होते. पर्यटकांचे मृतदेह आणण्यासाठी विमानाची सोय होऊ शकेल काय अशी विचारणा मी केली. मुखर्जीं साहेबांनी तातडीने विमान उपलब्ध करुन दिले. त्यावेळी रात्री गुलाम नबी आझादांचा पुन्हा फोन आला. त्यावेळी ते विमानतळावर होते,'' हे सांगताना पंतप्रधानांचा आवाज भरुन आला. 

"कोविड साथीच्या काळात मी सभागृह नेत्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी मी सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेटावे, असा सल्ला आझाद यांनी मला दिला होती. मी तो मानला. आझाद यांना सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये काम करण्याचा विशाल अनुभव आहे. काही वर्षांपूर्वी मी निवडणुकीच्या राजकारणात सक्रीय नसताना संसदेत आलो होतो. आम्ही संसदेच्या लाॅबीत आझाद यांच्याशी गप्पा मारत होतो. एका पत्रकाराने याबाबत आझाद यांना छेडले. त्यावेळी 'तुम्ही आम्हाला टीव्हीवर किंवा रस्त्यावर एकमेकांच्या विरोधात भांडताना पाहिले असेल, परंतु, या इमारतीत आम्ही सर्व जण एकत्र असतो,' असे उत्तर आझाद यांनी त्या पत्रकाराला दिले होते.," असेही मोदी म्हणाले. आझाद यांनी आपल्या सरकारी निवासस्थानात फुलवलेल्या बागेचाही मोदी यांनी आवर्जून उल्लेख केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभा सदस्या  शरद पवार यांनीही  आपल्या भाषणात आझाद यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. आझादांची कार्यशैली पाहून काँग्रेस नेतृत्त्वाने त्यांना युवक काँग्रेसचे अध्यक्ष बनवले. आम्ही त्यांना थोडे सिनिअर होतो. त्यांनी नव्या पिढीला संघटित करण्याचे काम चांगल्या पद्धतीने केले, असे पवार म्हणाले. ''ते काँग्रेसकडून वाशिमधून उभे राहिले. मी विरोधी पक्षात होतो. काश्मीरमधून आलेला नेता इथून निवडणूक लढवणार, म्हणून आम्ही विरोधात प्रचारही केला. पण ते चांगल्या मतांनी निवडून आले. त्यांनी तिथल्या लोकांचा विश्वास मिळवला.  वाशिमबरोबरच विदर्भाच्या विकासासाठीही त्यांनी काम केले. संसदेत त्यांनी अनेक वर्षे काढली. गुलाम नबी एकमात्र सदस्य आहेत की ज्यांना सर्व खात्यांचा सर्व कमिट्यांवर काम करण्याचा अनुभव मिळाला. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी काम केले. राज्यसभेतले विरोधी पक्षानेते पद त्यांनी सांभाळले.
सर्व पक्षाच्या नेत्यांशी त्यांनी उत्तम संबंध ठेवले. पन्नास वर्षांत मी एवढ्या जबाबदारीने काम करणार संसद सदस्य पाहिला नाही. योग्य वेळी जेव्हा तिथे निवडणुका येतील तेव्हा गुलाम नबी आझादांना पुन्हा सभागृहात येण्याची संधी मिळेल, असा मला विश्वास आहे. आपण कायम समाजाची सेवा केलीत ते आम्ही विसरणार नाही,'' असेही पवार म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com