अडवानी-मुरली मनोहर जोशींना अद्याप अयोध्येचे निमंत्रण नाही - No Invitation yet to Adwani And Murlimanohar Joshi for Ayodhya Ram Mandir program | Politics Marathi News - Sarkarnama

अडवानी-मुरली मनोहर जोशींना अद्याप अयोध्येचे निमंत्रण नाही

वृत्तसंस्था
रविवार, 2 ऑगस्ट 2020

अडवानी यांनी राममंदिराच्या मुद्द्यावर रथयात्रा काढली होती. ज्याचा भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा झाला. अयोध्येत तत्कालिन बाबरी मशिदीच्या जागी राममंदीर बांधण्याची कल्पना सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष व विश्व हिंदू परिषदेने पुढे आणली व त्यावर आंदोलन छेडले. डाॅ. मुरली मनोहर जोशी यांचीही या संपूर्ण आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका होती. अडवानी आणि जोशी हे दोघे बाबरी मशिद पाडण्याच्या खटल्यात आरोपी आहेत

नवी दिल्ली : अयोध्येचे राममंदीर हा ज्यांच्या ध्यास राहिला त्या माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी व रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले डाॅ. मुरली मनोहर जोशी या दोन दिग्गज नेत्यांना अयोध्येत ५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या राममंदिर भूमीपुजनाचे निमंत्रण अद्यापही पोहोचलेले नाही.

अडवानी यांनी राममंदिराच्या मुद्द्यावर रथयात्रा काढली होती. ज्याचा भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा झाला. अयोध्येत तत्कालिन बाबरी मशिदीच्या जागी राममंदीर बांधण्याची कल्पना सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष व विश्व हिंदू परिषदेने पुढे आणली व त्यावर आंदोलन छेडले. पुढे अडवानी यांनी देशभर रथयात्रा काढून वातावरण पेटवले. नंतर लाखो हिंदू नागरिकांनी अयोध्येत करसेवा केली. या सगळ्याची परिणती बाबरी मशिद पाडण्यात झाली. 

डाॅ. मुरली मनोहर जोशी यांचीही या संपूर्ण आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका होती. अडवानी आणि जोशी हे दोघे बाबरी मशिद पाडण्याच्या खटल्यात आरोपी आहेत. या प्रकरणाची सुनावणी सीबीआय न्यायलयात नुकतीच पूर्ण झाली आहे. न्यायालयाना येत्या ३० आॅगस्टच्या आत या प्रकरणाचा निकाल द्यावा लागणार आहे. मात्र, अद्यापर्यंत या दोन्ही नेत्यांना राममंदीर भूमीपुजनाचे उद्धाटनाचे निमंत्रण आलेले नाही. राममंदीर तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय हे दूरध्वनीवरुन दिल्या जाणाऱ्या आमंत्रणांचे संयोजन करत आहेत. मात्र, त्यांच्याकडूनही या नेत्यांना बोलावण्याबाबत स्पष्टता आलेली नाही. 

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ५ ऑगस्टला होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी आणि मुरलीमनोहर जोशी यांना पाठविण्यात आलेले नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार 65 वर्षांवरील व्यक्ती धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाहीत. याचे काटेकोर पालन करायचे झाल्यास मोदींनाही या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या भूमिपूजनाचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे बंधन सर्वांनाच पाळावे लागेल. यामुळे कार्यक्रमाला दोनशेपर्यंत व्यक्ती सहभागी होतील. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींची यादी अद्याप अंतिम झालेली नाही. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना प्रादुर्भावाच्या काळात धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यानुसार ६५ वर्षांवरील व्यक्तीला कार्यक्रमाला आरोग्याच्या कारणास्तव उपस्थित राहता येत नाही. त्यांनी घरी बसूनच कार्यक्रमास सहभाग नोंदवणे अपेक्षित आहे. याचबरोबर गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुलांसाठीही हाच निकष आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख