...म्हणून शरद पवार आज अन्नत्याग करणार! - NCP Leader Sharad Pawar to observe fast Today | Politics Marathi News - Sarkarnama

...म्हणून शरद पवार आज अन्नत्याग करणार!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

राज्यसभेत कृषी सुधारणा विधेयकावरून झालेल्या गोंधळानंतर निलंबित करण्यात आलेल्या आठ सदस्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण स्वतः आज दिवसभर अन्नत्याग करत आहोत, असे ज्येष्ठ नेते, राज्यसभा सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले

नवी दिल्ली : राज्यसभेत कृषी सुधारणा विधेयकावरून झालेल्या गोंधळानंतर निलंबित करण्यात आलेल्या आठ सदस्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आपण स्वतः आज दिवसभर अन्नत्याग करत आहोत, असे ज्येष्ठ नेते, राज्यसभा सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.

राज्यसभेत कृषी सुधारणा विधेयकावरुन परवा अभूतपूर्व गोंधळ झाला. त्यानंतर आठ सदस्यांना निलंबित करण्यात आले. हे सदस्य कालपासून संसद भवनाच्या आवारात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषण करत आहेत. हे विधेयक मांडत असताना शरद पवार अनुपस्थित होते. त्याबाबतही पवार यांनी खुलासा केला. मराठा आरक्षणावरुन राज्यातील मराठा समाजात अस्वस्थता आहे. या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्याबाबत अपिल करण्यासंदर्भात गेले दोन दिवस राज्यात मुख्यमंत्री व विविध नेत्यांशी चर्चा सुरु होती. त्यामुळे मला दिल्लीला जाता आले नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेत घडलेल्या प्रकाराबाबत पवार म्हणाले, "सभागृहात कृषी विषयक बिले येणार होती. त्यावर दोन-तीन दिवस चर्चा होण्याची अपेक्षा होती. मात्र, ही बिले तातडीने मंजूर करुन घेण्याबाबत सत्ताधारी पक्ष आग्रही दिसला. मी सभागृहाचे काम दूरचित्रवाणीवरुन पहात होतो. या बिलांतील तरतुदींबाबत सदस्यांना काही शंका, प्रश्न होते. ते मांडण्याचा त्यांचा आग्रह होता. मात्र, हा आग्रह मान्य न करता कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न दिसत होता. जे चालले आहे ते नियमबाह्य आहे, हे सदस्य सांगत होते. त्यासाठी नियम पुस्तक दाखवायचा त्यांचा प्रयत्न होता. म्हणून हे सदस्य वेलमध्ये आले होते. पण पुस्तक दाखवूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पुस्तक फाडण्याचा प्रकार घडला होता,"

पवार पुढे म्हणाले, "सदस्य जर नियमांचा आधार घेत असतील तर किमान नियम ऐकून घेण्याची उपाध्यक्षांकडून अपेक्षा होती. पण त्या ऐवजी तातडीने मतदान घेण्याची भूमीका घेतली गेली. ते मतदानही आवाजी पद्धतीने घेण्यात आले. साहजिकच सदस्यांची प्रतिक्रिया तीव्र होती. मी गेली पन्नास वर्षे विविध सभागृहांत काम केले आहे. अध्यक्ष वा उपाध्यक्षांनी कामकाजाकडे गांभीर्याने पहात सदस्यांना संधी द्यायला हवी, असे माझे मत आहे. गेल्या पन्नास वर्षांत पीठासीन अधिकाऱ्यांकडून मी असे वर्तन कधी पाहिले नाही.''

राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांच्याबाबत पवार म्हणाले, "कर्पूरी ठाकूर हे बिहारमधील ज्येष्ठ नेते होते. संसदीय कामाचे अभ्यासक होते. त्यांच्या विचाराने वागणारे म्हणून आम्ही हरिवंश यांच्याकडे पहात होतो. पण उपाध्यक्षांनी कर्पूरी ठाकूर यांच्या विचारांना तिलांजली दिली. आमची उपाध्यक्षांबद्दल जी समजूत होती ते चुकीची ठरली. आज उपाध्यक्षांनी उपोषण करणाऱ्या सदस्यांची भेट घेऊन त्यांना चहा देण्याचा प्रयत्न केल्याचे मी टीव्हीवर पाहिले. मला आनंद आहे की या सदस्यांनी या चहाला हातही न लावता आपले उपोषण सुरु ठेवले. या सदस्यांना पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः आज दिवसभर अन्नत्याग करणार आहे. उपाध्यक्षांच्या विचारांमध्ये परिवर्तन होईल असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही,"
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख