मोदींनी अडवानींचे नांवही नाही घेतले भाषणात - Narendra Modi Didn't Took Name of Lalkrishna Adwani in his speech At Ayodhya | Politics Marathi News - Sarkarnama

मोदींनी अडवानींचे नांवही नाही घेतले भाषणात

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

अयोध्येतील ऐतिहासिक आणि भव्य अशा राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज दिमाखदार सोहळ्यात पार पडले. यावेळी केलेल्या भाषणात मोदी यांनी रामजन्मभूमी आंदोलनाशी संबंधित कुठल्याही नेत्याचा उल्लेख केला नाही

अयोध्या : रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात रथयात्रेच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करणारे माजी उपपंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्या नांवाचा उल्लेखही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या भाषणात केला नाही. या उलट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मात्र आपल्या भाषणात अडवानींचा आदरपूर्वक उल्लेख केला. 

अयोध्येतील ऐतिहासिक आणि भव्य अशा राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज दिमाखदार सोहळ्यात पार पडले. या वेळी मोदी यांच्यासोबत उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम जन्मभूमी ट्रस्टचे नृत्यगोपालदास महाराज आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निमंत्रण अडवानी यांना देण्यात आले नव्हते. राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी १७५ मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यात १३५ संतांचाही समावेश होता. मात्र, या संपूर्ण आंदोलनाचे कर्तेधर्ते असलेले नेते मात्र या कार्यक्रमापासून दूरच राहिले. 

तीस वर्षाच्या संघर्षाच्या मेहनतीचे हे फळ आहे अशा भावना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी व्यक्त केल्या. यावेळी ते म्हणाले, "रामजन्मभूमी आंदोलनात जे शहिद झाले ते सूक्ष्म रुपात या ठिकाणी उपस्थित आहेत. असेही अनेक जण आहेत की जे हयात आहेत पण येथे येऊ शकत नाहीत. रथयात्रेचे आयोजन करणारे अडवानीजी आपल्या घरात बसून हा कार्यक्रम पहात असतील. अनेक लोक असे आहेत की जे येऊ शकतात पण आजच्या परिस्थितीमुळे त्यांना बोलावता येऊ शकत नाही,''

लालकृष्ण अडवानी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढून राममंदिराबाबतची वातावरण निर्मिती केली होती. याचा नंतर भारतीय जनता पक्षालाही राजकीय फायदा झाला. अडवानी हे बाबरी मशिद पाडल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी आहेत. गेल्याच आठवड्यात ते लखनौ न्यायालयासमोर व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. सुमारे साडेचार तास ही सुनावणी चालली होती. अशा या नेत्याचा साधा उल्लेखही पंतप्रधानांच्या भाषणात नसावा याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. केवळ अडवानीच नव्हे तर विजयाराजे शिंदे, मुरली मनोहर जोशी, अशोक सिंघल, तत्कालिन मुख्यमंत्री कल्याणसिंह, साध्वी ऋतंभरा, साध्वी उमा भारती यापैकी कुठल्याच नांवाचा उल्लेख पंतप्रधानांच्या भाषणात नव्हता. 
Editet By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख