पक्षासाठी विस्मृतीत गेलेल्या काॅंग्रेसला आली नरसिंहराव यांची आठवण

सोनिया गांधी या 1998 मध्ये काॅंग्रेसच्या अध्यक्षा झाल्यानंतर पी. व्ही. नरसिंहराव यांना काॅंग्रेस पक्षाने कधीच आदराचे स्थान दिले नाही. आता मात्र काॅंग्रेसला त्यांचे स्मरण झाले आहे.
p v narshinhrao
p v narshinhrao

हैदराबाद : पी. व्ही. नरसिंहराव यांनी देश आथिॅक संकटात असताना पंतप्रधानपद स्वीकारले. आर्थिक सुधारणांचे आव्हान पेलत त्यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मुलभूत सुधारणा केल्या, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले.

माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त व्हर्च्युअल कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या बैठकीत ते बोलत होते. तेलंगण प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित बैठकीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट प्रसारण करण्यात आले. जन्मशताब्दी सोहळा वर्षभर चालणार आहे.

मुख्य कार्यक्रम गांधी भवनातील इंदिरा भवन येथे आयोजित केला होता. झूम ॲपच्या माध्यमातून देशभरातील सुमारे हजार पाहुणे जोडले गेले होते. यात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, जयराम रमेश यांचा समावेश होता. पीव्हीएनआर जन्मशताब्दी सोहळा समितीच्या अध्यक्षा डॉ. गीता रेड्डी, नरसिंह राव यांचे बंधू पी. व्ही. मनोहर राव आदी मान्यवरांनी या वेळी भाषणं केली. माजी

राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले, की काही वेळा अशक्य वाटणारी बाब शक्य करुन दाखवण्याची क्षमता नरसिंह राव यांच्याकडे होती. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात जमीन सुधारणा केली आणि प्रस्थापितांचे वर्चस्व संपवले. हा निर्णय धाडसी होता. त्यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मूलगामी सुधारणा घडवून आणल्या. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी माजी सनदी अधिकारी सी. डी. देशमुख यांना देशाचे अर्थमंत्री म्हणून मंत्रिमंडळात प्रवेश दिला. पंडित नेहरु यांच्यानंतर नरसिंह राव यांनी अर्थव्यवस्थेत मूलभूत सुधारणा राबवण्यासाठी आरबीआयचे माजी गर्व्हनर डॉ. मनमोहनसिंग यांना आणले. देशाची अर्थव्यवस्था बिकट असताना पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि कालांतराने त्यांनी आर्थिक सुधारणा घडवून आणल्या, असे मुखर्जी म्हणाले. तसेच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा संदेश वाचून दाखवण्यात आला. राहुल गांधी यांनी एका संदेशाद्वारे पी. व्ही. नरसिंहराव जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या तेलंगण प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अभिनंदन केले.

नरसिंहरावांच्या काळात अनेक आव्हानांवर मात : सोनिया
उत्तमकुमार रेड्डी यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा संदेश वाचून दाखवला. पी. व्ही. नरसिंह राव यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाच्या माध्यमातून दीर्घकाळ देशाची सेवा केली आहे. देश आर्थिक संकटात असताना ते पंतप्रधान झाले होते. त्यांच्या धाडसी नेतृत्वाच्या बळावर देशाने अनेक आव्हानांवर यशस्वीपणे मात केली, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com