नवी दिल्ली : राज्यसभेत गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर विरोधी पक्षनेते या नात्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नव्या कारकिर्दीला आजपासून सुरवात झाली आहे. राज्यसभेतील घटते संख्याबळ हा काँग्रेससाठी चिंतेचा विषय असताना त्यावर मात करून मोदी सरकारच्या विरोधात आक्रमकता दाखविण्याचे आव्हान खर्गे यांच्यापुढे असेल.
मागील ४९ वर्षांपासून कर्नाटक विधीमंडळाच्या आणि संसदीय राजकारणात सक्रीय असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांची महाराष्ट्रात काँग्रेस प्रभारी या नात्याने महाविकास आघाडी सरकार स्थापनेमध्येही महत्त्वाची भूमिका राहिली आहे. तर, मागील लोकसभेमध्ये काँग्रेसचे गट नेते राहिलेल्या मल्लिकार्जुन खर्गे यांची सत्ताधाऱ्यांवर बोचरी टिका करणाची आक्रमक परंतु, नर्मविनोदी शैली उल्लेखनीय होती. आता गंभीर चर्चेचे व्यासपिठ मानले जाणाऱ्या वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत त्यांच्या विरोधी पक्षनेते पदाचा कस लागणार आहे.
आझाद यांचे राज्यसभेतील खासदारकीची मुदत काल (ता. १५) संपल्यानंतर आजपासून औपचारिकरित्या मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते झाले. एकीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे राज्यसभेतील घटलेले संख्याबळ आणि दुसरीकडे नेतृत्वाविरोधातील ज्येष्ठाच्या नाराजीमुळे उफाळलेले संघटनात्मक मतभेद या पार्श्वभूमीवर काँग्रेसची आक्रमकता राज्यसभेमध्ये प्रभावीपणे मांडण्याचे आव्हान खर्गेंपुढे असेल. सध्या काँग्रेसचे फक्त ३६ खासदार राज्यसभेत असून सत्ताधारी भाजपचे या सभागृहातही पूर्ण बहुमत झाले आहे.
त्या पार्श्वभूमीवर या नव्या जबाबदारीविषयी 'सकाळ' शी बोलताना खर्गे यांनी मोदी सरकारचे वर्तन हे लोकशाहीच्या अस्तित्वालाच नख लावणारे असून याविरोधात राजकीय पक्षांनीच नव्हे तर जनता आणि प्रसारमाध्यमांनीही भूमिका घेणे गरजेचे असेल, अशी भूमिका मांडली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती अभिभाषणानंतरच्या धन्यवाद प्रस्तावावर राज्यसभेमध्ये सुरळीत चर्चा झाली. तर लोकसभेमध्ये प्रचंड गोंधळामुळे आठवडाभर काहीही कामकाज होऊ शकले नव्हते. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर विभागलेला आणि गोंधळलेला पक्ष अशी टिकाही केली होती.
लोकसभा आणि राज्यसभेतील परस्पर विरोधी रणनितीचा आरोप फेटाळला. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली दोन्ही सभागृहांमधील नेत्यांच्या सहमतीनेच निर्णय होत असतो, असे स्पष्ट केले. शेतकरी आंदोलनाचा मुद्दा काँग्रेसने सर्वप्रथम लावून धरला होता. पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व राहुल गांधींनी केले आणि हरियानातील भाजप सरकारने त्यांना अडवले होते याकडेही खर्गे यांनी लक्ष वेधले. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी डावे पक्ष वगळता काँग्रेसला इतर विरोधी पक्षांची फारशी साथ मिळत नाही, असे काँग्रेसमधून सातत्याने बोलले जाते. त्यावर खर्गे यांनी, गाणे चांगले होण्यासाठी गवयासोबतच इतरांची, वादकांचीही भूमिका महत्त्वाची असते, असे सूचक विधान केले.
Edited By - Amit Golwalkar

