राहुल गांधींशी चर्चा केल्यास अडचणीत याल : या उद्योजकाला मिळाला होता सल्ला!

राहुल गांधींशी चर्चा न करण्याचा सल्ला एका मित्राने दिला होता. अशी चर्चा करून अडचणीत येशील असे या मित्राचे म्हणणे होते. मात्र आपण केवळ उद्योग, अर्थव्यवस्था आणि लाॅकडाऊन यावरच बोलणार आहोत, असे या मित्राला सांगितल्याचे राजीव बजाज म्हणाले. अर्थात, या मित्राचे नाव सांगण्याचे बजाज यांनी टाळले.
rajiv bajaj
rajiv bajaj

नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या मुकाबल्यासाठी मोदी सरकारच्या उपाययोजनांवर बजाज आॅटोचे महासंचालक राजीव बजाज यांनी कडाडून टिका केली. भारतात लागू केलेला लाॅकडाऊन भयंकर (ड्रॅकोनियन) असल्याचे म्हणताना बजाज यांनी गरीबांना थेट आर्थिक मदत न देण्याच्या सरकारच्या धोरणावरही सवाल उपस्थित केला.

काॅंग्रेस नेते राहुल गांधींनी कोरोना संकटावर साधलेल्या संवादादरम्यान बजाज आॅटोचे महासंचालक राजीव बजाज यांनी ही नाराजी व्यक्त केली. मोदी सरकाच्या धोरणाविरोधात राहुल गांधी सातत्याने आक्रमकपणे बोलत असून लाॅकडाऊन आणि आर्थिक संकटाबाबत राहुल यांनी रिझर्व बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला होता. याच मालिकेत त्यांनी राजीव बजाज यांच्याशी चर्चा केली. राहुल गांधींनी लाॅकडाऊन पुर्णपणे अपयशी असल्याचा टोला लगावला होता. या चर्चे दरम्यान राजीव बजाज यांनी जगातील इतर एकाही देशामध्ये असा लाॅकडाऊन लागू झाल्याचे ऐकिवात नाही, अशा शब्दात लाॅकडाऊनवर कडाडून टिका केली.

राजीव बजाज म्हणाले, की कोरोनाशी मुकाबला करताना भारताने पूर्वेकडील देशांऐवजी पाश्चात्य देशांकडे पाहण्यात धन्यता मानली. प्रत्यक्षात या देशांची भौगोलिक स्थिती, रोगप्रतिकार क्षमता, तेथील तापमान या सर्व गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. पाश्चात्यांची नक्कल करताना कठोरपणे लाॅकडाऊन लागू करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही योग्य प्रकारे झाला नाही आणि यामुळे अर्थव्यवस्थाच उध्वस्त झाली. कोरोनाचा चढता आलेख खाली येण्याऐवजी जीडीपीचा आलेखच भूईसपाट झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

भारताने जपान किंवा स्विडन सारखी पावले उचलायला हवी होती. दोन्ही देशांनी हर्ड इम्युनिटी (रोग प्रतिकार क्षमता विकसीत करणे) भर दिला. याचा अर्थ जोखीम असणाऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही. सॅनिटायझेशन, मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. दुर्दैवाने भारतात अर्धवट लाॅकडाऊन लागू झाला. अशा प्रकारचा लाॅकडाऊन लागू झाल्याचे जगात दुसरे कोणतेही उदाहरण नाही. इतर देशांमध्ये लोक जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी मोकळे होते. परंतु आपल्याकडे बाहेर निघणाऱ्यांना पोलिसांनी मारझोड केली आणि अपमानित केले. यातून ज्येष्ठ नागरिकही वाचले नाहीत.

रस्ते अपघातात सर्वाधिक लोक बळी जात असल्याकडे लक्ष वेधताना राजीव बजाज यांनी, पोलिस हेल्मेटबाबत बोलत नाही पण मास्क नसल्यास देशद्रोही ठरवत असल्याची खवचट प्रतिक्रियाही व्यक्त केली. जगात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू
भारतात होतात. एखादा व्यक्ती हेल्मेट न वापरता गाडी चालवत असेल तर 99.9 टक्के प्रकरणांमध्ये पोलिस काहीही बोलत नाहीत. परंतु एखाद्याकडे मास्क नसेल तर त्याला पोलिस लाठीने झोडपतात. उठबशा काढायला लावून अपमानीत करतात. देशद्रोही असल्याचा, गाढव असल्याचा फलक धरण्यास त्यांना भाग पाडले जाते. बाहेर निघालेल्या ज्येष्ठ नागरिकांना मारहाण झाल्याचे आपण स्वतः पाहिल्याचेही राजीव बजाज म्हणाले.
मोदी सरकारच्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजवरही राजीव बजाज यांनी प्रश्न उपस्थितकेला. जगभरात अन्य देशांमध्ये जाहीर झालेल्या पॅकेजपैकी दोन तृतियांश निधी थेट संघटना, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला. भारतात मात्र हे प्रमाण केवळ दहा टक्क्यांपर्यंतच आहे. लोकांना थेट आर्थिक मदत का नाही दिली, अशी विचारणाही त्यांनी केली.

चर्चा केल्यास अडचणीत येऊ....
राहुल गांधींशी चर्चा न करण्याचा सल्ला एका मित्राने दिला होता. अशी चर्चा करून अडचणीत येशील असे या मित्राचे म्हणणे होते. मात्र आपण केवळ उद्योग, अर्थव्यवस्था आणि लाॅकडाऊन यावरच बोलणार आहोत, असे या मित्राला सांगितल्याचे राजीव बजाज म्हणाले. अर्थात, या मित्राचे नाव सांगण्याचे बजाज यांनी टाळले. विकसित देशांतील श्रीमंत प्रभावित झाल्यामुळेच कोरोना एवढा सनसनाटी बनला. क्षयरोग न्युमोनिया, डायरी सारख्या आजारांनी भारतात लक्षावधी जण मृत्यूमुखी पडतात. पण कोरोनाने विकसीत देशांना अडचणीत आणले. श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींवर परिणाम झाला की त्याचा माध्यमांमध्ये मथळा बनतो. आफ्रिकेत दररोज 8 हजार बालके भुकेमुळे प्राण सोडतात पण त्याचा विचार कोण करतो, असा उद्विग्न सवालही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com