रामदेवबाबा म्हणतात, पतंजली योगपीठ अयोध्येत भव्य गुरुकुल उभारणार - yoga guru ramdev says patanjali will establish gurukul in ayodhya | Politics Marathi News - Sarkarnama

रामदेवबाबा म्हणतात, पतंजली योगपीठ अयोध्येत भव्य गुरुकुल उभारणार

वृत्तसंस्था
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन आज होत आहे. याची जोरदार तयारी अयोध्येत सुरू असून, कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. 

अयोध्या : ऐतिहासिक आणि भव्य-दिव्य अशा राममंदिराच्या भूमिपूजन समारंभासाठी अवघी अयोध्या नगरी सजली आहे. शरयू तीर भगव्या रंगामध्ये न्हाऊन निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज (ता. ५) राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमासाठी योगगुरु रामदेवबाबा अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यांनी आता देशात रामराज्याची स्थापना होण्यास सुरूवात झाल्याचे म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी पाच हजार शंभर एवढे कलश तयार करण्यात आले आहेत. त्यातील काही कलशांचा वापर हा प्रत्यक्ष विधीप्रसंगी केला जाणार आहे. काही कलश हे  पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गावरून जाईल त्याभोवती ठेवले जातील. या सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे तीन तास अयोध्यानगरीमध्ये असतील. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येसह लगतच्या भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

बाहेरील कोणत्याही व्यक्तीस शहरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. मंदिराच्या या भूमिपूजन कार्यक्रमासाठी १७५ मान्यवरांना निमंत्रण दिले असून, त्यात १३५ संतांचा समावेश आहे. मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त पाचजण असतील. मोदींच्या हस्ते यावेळी ४० किलो वजनाच्या चांदीच्या कोनशिलेचे लोकार्पण करण्यात येईल. या सोहळ्यानिमित्त अयोध्येत ५१ हजार लाडूंचे वाटप होणार असून, भूमिपूजनात सहभागी पाहुण्यांना चांदीचा शिक्का भेट देण्यात येईल. शरयू नदीच्या तीरावर काल सायंकाळी रोषणाई करण्यात आली होती. 

या कार्यक्रमासाठी रामदेवबाबा आज अयोध्येत दाखल झाले आहेत. ते रामजन्मभूमी स्थळी पोचले आहेत. आता देशात खरी रामराज्याची स्थापना होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, आपण राम मंदिराचा कार्यक्रम पाहत आहोत, ही सर्वच भारतीयांसाठी भाग्याची घटना आहे. अयोध्येत आता पतंजली योगपीठ भव्य असे गुरुकुल उभारणार आहे. या ठिकाणी जगभरातून येणारे लोक वेद आणि आयुर्वेदाचा अभ्यास करु शकतील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा
११.४०: हनुमान गढी येथे दहा मिनिटे दर्शन आणि पूजा
१२.००: राम जन्मभूमी येथे पोचणार
१२.१० : रामलल्ला विराजमानचे दर्शन आणि पूजा
१२.१५: रामलल्ला परिसरात पारिजात रोपट्याचे रोपण
१२.३०: भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला सुरवात
१२.४०: राम मंदिर भूमिपूजन कोनशिलेची स्थापना
२.०५: साकेत महाविद्यालयाकडे प्रयाण
२.२० : हेलिकॉप्टरने लखनौकडे रवाना
 
कडेकोट बंदोबस्त
- अयोध्येची सुरक्षा एसपीजीकडे
- शहराच्या सगळ्या सीमा सील
- बाहेरच्या व्यक्तींनी प्रवेश नाही
- स्थानिकांना ओळखपत्र अनिवार्य
- सर्वच भागांवर ड्रोनची नजर

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख