बापरे! ताशी १८५ किमी वेगाने वाहतील वारे...'यास' चक्रीवादळही उडवणार दाणादाण - Yaas Cyclone Low pressure area intensify into a cyclonic storm | Politics Marathi News - Sarkarnama

बापरे! ताशी १८५ किमी वेगाने वाहतील वारे...'यास' चक्रीवादळही उडवणार दाणादाण

वृत्तसंस्था
रविवार, 23 मे 2021

पुढील दोन दिवसांत वादळ रौद्र रुप धारण करेल, अशी शक्यता आहे.

नवी दिल्ली : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तोक्ते (Tauktaeylone C) चक्रीवादळाने महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, केरळ आदी राज्यांना जोरदार तडाखा दिला. त्यानंतर आता तेवढ्याच तीव्रतेचे यास हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात घोंघावत आहे. हे वादळ तोक्ते व मागील वर्षीच्या अम्फान (Amphan Cyclone) एवढेच भयानक असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, ओरिसासह पू.र्व किनारपट्टीवरील राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Yaas Cyclone Low pressure area intensify into a cyclonic storm)

तोक्ते वादळाची तीव्रता कमी होत नाही, तोच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचे रुपांतर वादळात झाले असून यास हे नाव देण्यात आले आहे. हे वादळही तोक्तेप्रमाणेच पुढे सरकत असताना त्याची तीव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत वादळ रौद्र रुप धारण करेल, अशी शक्यता आहे.

हेही वाचा : सुब्रह्मण्यम स्वामी महाराष्ट्रासाठी आले धावून; थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

हवामान विभागाचे उप महाव्यवस्थापक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्याचे रुपांतर वादळात झाले आहे. सोमवारी (ता. २४) त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. हे वादळ उत्तर-पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. त्याचे रुपांतर आणखी तीव्र वादळात होऊन पश्चिम बंगाल व ओरिसा किनारपट्टीवरील प्रदीप व सागर बेटांच्या दरम्यान धडकेल. त्यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १८५ किमी एवढा राहील. हा वेग खूप नुकसानकारक आहे. तोक्ते आणि अम्फान या वादळांशी त्याची तुलना केली जाऊ शकते, असा इशारा मोहपात्रा यांनी दिला.

यास हे वादळ २६ मे रोजी किनारपट्टीला धडकेल, असे हवामान विभागाने सांगितले आहे. वादळाच्या इशाऱ्यानंतर मदत व बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या ७५ टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५९ टीम सध्या तैनात करण्यात आल्या आहेत. मच्छीमारांनी २६ तारखेपर्यंक समुद्रात न जाण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक

यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित राज्य, केंद्रीय मंत्रालय आणि आपत्कालीन संस्थांच्या तयारीच्या आढाव्यासाठी बैठक बोलावली होती. बैठकीला गृहमंत्री अमित शहा हेही उपस्थित होते. गृह मंत्रालयाकडून राज्य व केंद्र शासित प्रदेशांशी सतत संपर्क साधला जात आहे. भारतीय तटरक्षक दल, नौदल बचावकार्यासाठी सज्ज ठेवण्यात आलं आहे. किनारपट्टीवरील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख