...तर कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होईल

कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी होत अशा देशांमध्ये उपाययोजनांच्या अंमलबजावणीत शिथिलता आणल्यास पुन्हा एकदा उद्रेक होण्याची शक्यता असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) दिला आहे.
world health organization cautions second wave of corona transmission
world health organization cautions second wave of corona transmission

जिनिव्हा : ‘डब्लूएचओ’च्या आपत्कालीन घटना विभागाचे प्रमुख डॉ. माइक रायन यांनी एक निवेदन प्रसिद्ध करताना हा इशारा दिला आहे. डॉ. रायन यांच्या म्हणण्यानुसार, जग अद्यापही कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेच्या मध्यावरच आहे. काही देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटत असली तरी अमेरिका, दक्षिण आशिया आणि आफ्रिकेत रुग्णसंख्या वाढत आहे. साथीच्या रोगांची एका मागून एक लाट येऊ शकते. म्हणजेच, सध्या ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी होत आहे, तिथेच या वर्षाच्या अखेरीस संसर्गाची दुसरी लाट येऊ शकते. 

संसर्गाविरोधात सध्या अमलात असलेल्या उपाययोजना शिथिल केल्यास दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्यावाढीचा वेग प्रचंड असू शकतो, असेही डॉ. रायन यांनी सांगितले. अमेरिका, युरोप यांनी कोरोनाविरोधातील उपाययोजना लागू करणे सुरुच ठेवावे, चाचण्यांची संख्याही वाढवावी, असा सल्ला डॉ. रायन यांनी दिला आहे. 

‘डब्लूएचओ’चे म्हणणे 

- उपाययोजना कायम न ठेवल्यास दुसऱ्या लाटेचा धोका 
- संसर्गाचा वेग कधीही वाढू शकतो 
- सध्या रुग्णसंख्या कमी होते म्हणजे साथ संपेलच असे नाही. ती दुसऱ्या लाटेची सुरवात असू शकते. 

लसीचे मानवावर प्रयोग सुरु 

कोरोना विषाणूवरील लसीच्या मानवावरील प्रयोगाला ऑस्ट्रेलियात सुरवात केल्याचे अमेरिकेतील बायोटेक्नोलॉजी क्षेत्रातील कंपनी ‘नोव्हावॅक्स’ने आज जाहीर केले. सर्व प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण करून या वर्षाअखेरीस मान्यताप्राप्त लस बाजारात आणण्याचा विश्‍वास या कंपनीने व्यक्त केला आहे. मानवावरील चाचणीच्या पहिल्या टप्प्यात मेलबर्न आणि ब्रिस्बेन शहरातील स्वच्छेने पुढे आलेल्या १३१ जणांवर लसीचा प्रयोग केला जाणार आहे. यानंतर लसीच्या परिणामांचे निरीक्षण केले जाणार आहे, असे कंपनीचे संशोधन प्रमुख डॉ. ग्रेगरी ग्लेन यांनी सांगितले. चाचणी सुरु असतानाच दुसरीकडे आम्ही लसीचे उत्पादनही सुरु केले आहे. ही लस चाचणीमध्ये यशस्वी ठरण्याचा आम्हाला विश्‍वास आहे, असे ग्लेन यांनी सांगितले. चीन, अमेरिका आणि युरोपसह अनेक देशांमध्ये लस निर्माण करण्यासाठी प्रयोग सुरु असून यातील बहुतेक प्रयोग प्राथमिक अवस्थेत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com