काँग्रेसच्या हातातून गेलं पण भाजपचं कमळही फुललं नाही! - Will not stake claim to form govt at this stage says BJP chief | Politics Marathi News - Sarkarnama

काँग्रेसच्या हातातून गेलं पण भाजपचं कमळही फुललं नाही!

वृत्तसंस्था
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

पुदुच्चेरीतील काँग्रेसचे सरकार कोसळल्यानंतर भाजपलाही तिथे सत्ता स्थापन करता येणार नाही.

पुदुच्चेरी : पुदुच्चेरीतील काँग्रेसचे सरकार कोसळल्यानंतर भाजपलाही तिथे सत्ता स्थापन करता येणार नाही. त्यांचा पुदुच्चेरीमध्ये एकही निवडून आलेला आमदार नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुका होईपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता आहे. 

काँग्रेस आघाडीतील पाच आमदारांनी राजीनामा दिल्याने आत विधानसभेत सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले. पण बहुमत गाठण्यासाठी १४ आमदारांचा आकडा काँग्रेसकडे नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी सभागृहात भाषण करून विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याआधीच बाहेर पडले. त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा नायब राज्यपालांकडे सोपवला. 

तमिळनाडू व पुदुच्चरी राज्यांची निवडणूक काही महिन्यांतच होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडूमध्ये काँग्रेस व डीएमके यांनी आघाडी होती. या दोन पक्षांचीच पुदुच्चरीमध्ये सत्ता होती. एकूण ३० विधानसभा सदस्य असलेल्या पुदुच्चरीमध्ये काँग्रेसचे १५ आमदार होते. डीएमकेच्या दोन आमदारांच्या समर्थनानंतर बहुमताचा आकडा पार केला होता. राजीनामा दिलेले पाच आमदार अद्याप कोणत्याही पक्षा गेलेले नाहीत.

हेही वाचा : सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वड्रा एसी कारवरून आले सायकलवर...

विरोधी पक्षांकडे १४ आमदार असले तरी ते सरकार स्थापन करण्याचा दावा करणार नाहीत. कारण, येत्या मे महिन्यांपर्यंत पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. त्यासाठी केवळ दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे कोणताही विरोधी पक्ष एवढ्या कमी कालावधीसाठी दावा करण्याची शक्यता धुसर आहे. याबाबत भाजपनेही स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे काँग्रेसने सत्ता गमावली असली तरी भाजपसह अन्य कोणत्याही पक्षाचे सरकार येणार नाही, असेच चित्र आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष व्ही. समीनाथन म्हणाले, ''सध्याच्या स्थितीत भाजप सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करणार नाही. पण निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएची सत्ता येईल.'' 

दरम्यान, मुख्यमंत्री नारायणसामी यांनी सत्ता गमावल्यानंतर भाजपला लक्ष्य केले आहे. भाजपने आमदारांना लाच दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही भाजपवर टीका केली आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आता पुदुच्चेरीमध्येही हेच पाहायला मिळाले. त्यांनी राजस्थामध्येही हे करण्याचा प्रयत्न केला पण येथील लोकांनी त्यांना धडा शिकवला, अशी टीका गेहलोत यांनी केली. 

हेही वाचा : काँग्रेसचं सरकार कोसळलं...

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच पुद्दुचेरीचा दौरा केला होता. या दौऱ्यानंतर काँग्रेसचे सरकार वाचेल अशी चर्चा होती. पण त्यात अपयश आल्याने काँग्रेसला सत्ता राखली आली नाही. काही महिन्यांत विधानसभा निवडणुका असून त्याआधीच सत्ता गमावल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांत पुद्दुचेरीमध्ये येणार आहेत. यावेळी ते केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लोकार्पण करणार आहेत. 

दरम्यान, विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाताना मुख्यमंत्री नारायणसामी यांनी सभागृहात सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले की, आम्ही डीएमके आणि अपक्षांसोबत मिळून सरकार स्थापन केले. त्यानंतर आम्ही एकत्रितपणे अनेक निवडणुका लढलो.

आम्ही या सर्व निवडणुका जिंकलो. त्यामुळे येथील लोकांचा आमच्यावर विश्वास असल्याचे स्पष्ट होते. केंद्र सरकारसह आधीच्या नायब राज्यपालांनी अनेक अडथळे आणले. आम्ही विनंती करूनही केंद्र सरकारने निधी दिला नाही. तमिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये आम्ही दोन भाषा प्रणिली आणली. पण भाजपने जबरदस्तीने हिंदी लादण्याचा प्रयत्न केला, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख