Vikas Dubey Was sure about his death at the Hands on UP Police | Sarkarnama

विकास दुबे गयावया करत म्हणत होता....उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देऊ नका!

वृत्तसंस्था
रविवार, 12 जुलै 2020

मिळालेल्या माहितीनुसार उज्जैनच्या महाकाल मंदीरात पकडला गेल्यानंतर विकास दुबेला व्हिडिओ काॅन्फरन्सिगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. पकडले गेल्यापासून दुबे आपल्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देऊ नका, अशा विनवण्या करत होता

लखनौ : उत्तर प्रदेश पोलिस सूड म्हणून आपला एन्काउंटर करतील याची खात्री बहुदा गँगस्टर विकास दुबेला पटली असावी. कारण ज्यावेळी मध्य प्रदेश पोलिसांनी उज्जैनमध्ये त्याला पकडले तेव्हा तो त्यांच्यासमोर गयावया करत होता. तो म्हणत होता, ''मला इथेच तुरुंगात टाका. मला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देऊ नका.''

मिळालेल्या माहितीनुसार उज्जैनच्या महाकाल मंदीरात पकडला गेल्यानंतर विकास दुबेला व्हिडिओ काॅन्फरन्सिगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. पकडले गेल्यापासून दुबे आपल्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देऊ नका, अशा विनवण्या करत होता. न्यायालयीन सुनावणीनंतर दुबेला पोलिसांच्या ताफ्यात मध्य प्रदेश-उत्तर प्रदेश सीमेवरील गुणा येथे नेऊन उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्या संपूर्ण प्रवासातही तो आपल्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले जाऊ नये, म्हणून गयावया करत होता, असे या ताफ्यातील एका पोलिसांने स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना सांगितले आहे. 

ठाण्यात पकडलेल्या दोघांना 'क्लिन चीट'

दरम्यान, गँगस्टर विकास दुबे प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिस कोलांटउड्या मारत आहेत. काल ठाण्यात विकास दुबेच्या ज्या दोन साथीदारांना महाराष्ट्र एटीएसने पकडले होते, त्यांना कानपूर पोलिसांनी मात्र 'क्लिन चीट' देऊन टाकली आहे. तीन जुलैला या दोघांची नावे कानपूर पोलिसांनी जाहीर केली होती व त्यांच्यावर पंचवीस हजारांचे इनामही जाहीर केले होते. 

काल ठाण्यात महाराष्ट्र एटीएसने अरविंद उर्फ गुड्डन त्रिवेदी आणि सोनू तिवारी या दोन जणांना ताब्यात घेतले. हे विकास दुबेचे साथीदार आहेत. हे दोघेही २ जुलैला विकास दुबे व त्याच्या साथीदारांनी आठ पोलिसांचे हत्याकांड केले त्यात सहभागी होते, असे उत्तर प्रदेश पोलिसांनी जाहीर केले होते. यापैकी गुड्डन त्रिवेदी हा विकास दुबेने राज्यमंत्र्यांच्या केलेल्या खुनात सहभागी होता, तर सोनू तिवारी हा विकास दुबेचा चालक होता, असे सांगितले गेले होते. 

कानपूर हत्याकांडानंतर पोलिसांनी विकास दुबेच्या २५ साथीदारांची यादी जाहीर करुन त्यांच्यावर प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचे ईनाम जाहीर केले होते. त्यात गुड्डन त्रिवेदी व सोनू तिवारी यांचीही नावे होती. आज मात्र, पलटी मारत उत्तर प्रदेश पोलिसांनी या दोघांचाही २ जुलैच्या रात्री घडलेल्या घटनेशी संबंध नसल्याचा दावा केला आहे. 

Edited By - Amit Golwalkar

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख