....म्हणून सोनिया गांधींशी संपर्क साधला नाही : विहिंपचे स्पष्टीकरण - VHP Explains Ayodhya Ram Mandir Construntion Drive | Politics Marathi News - Sarkarnama

....म्हणून सोनिया गांधींशी संपर्क साधला नाही : विहिंपचे स्पष्टीकरण

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 मार्च 2021

निधी संकलनात कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी अजिबात संपर्क साधला गेला नाही कारण काही मागण्यासाठी आधी दोन्ही बाजूंनी मने जुळावी लागतात. 'दुसऱ्या' बाजूने असलेला अडथळा दिसत असल्याने आम्ही कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशी संपर्क साधलाच नसल्याचे विहिंपने म्हटले आहे. 

नवी दिल्ली : अयोध्येतील राममंदिराच्या पायाभरणीतील तांत्रिक अडतळे जवळपास दूर झाले असून प्रत्यक्ष पाया बांधण्याच्या पुढील महिन्यापासून (एप्रिल) सुरू होईल व आगामी जास्तीत जास्त ३ वर्षे किंवा ३९ महिन्यांत मंदिरनिर्मिती पूर्ण करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे अशी माहिती विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.

दरम्यान निधी संकलनात कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी अजिबात संपर्क साधला गेला नाही कारण काही मागण्यासाठी आधी दोन्ही बाजूंनी मने जुळावी लागतात. 'दुसऱ्या' बाजूने असलेला अडथळा दिसत असल्याने आम्ही कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशी संपर्क साधलाच नसल्याचे विहिंपने म्हटले आहे. 

''प्रस्तावित राममंदिरासाठी आतापावेतो (४ मार्च अखेर) २५०० कोटींचा निधी जमा झाला आहे. देशविदेशांतून अजूनही देणगीदारांचे फोन येत असून त्यांना यासाठी उघडलेल्या बॅंक खात्यांची माहिती देण्यात येत आहे. मंदिर परिसराच्या विस्तारित नियोजनातील कामासाठी त्यातील वाढीव निधी खर्च केला जाईल व खर्च झालेल्या प्रत्येक पैचा हिशोब लेखापरीक्षणाद्वारे सार्वजनिक केला जाईल. मंदिराच्या पायाभरणीपूर्वी जन्मभूमीवर ३५ फूट खोलीवरील माती, दगड आदी हटविण्याचे व खोदकाम करण्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे व ुर्वरीत काम महिनाभरात पूर्ण होऊन एप्रिलमध्ये प्रत्यक्ष पायाभरणी सुरू होईल,'' अशी माहिती देण्यात आली आहे. 

 या मंदिराच्या बांधकामात भरतपूर परिसरातील बन्सी पर्वतावरील दगडाचा मुख्यतः वापर करण्यात येणार आहे. विश्‍व हिंदू परिषदेचे महासचिव चंपत राय यांच्या म्हणण्यानुसार निधी संकलनासाठी १० कोटींहून जास्त कुटुंबाबरोबर विहिप कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष संपर्क साधला. यासाठी सुमार ३९ हजार कार्यकर्त्यांची पावणेदोन लाख पथके स्थापन करण्यात आली होती, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान निधी संकलनाच्या मोहीमेत केरळपासून इशान्येकडील राज्यांपर्यंत देशभरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे राय यांनी सांगितले. राजस्थानातून सर्वाधिक निधी जमा झाल्याचे राय म्हणाले. केरळमधून १३ कोटी, तमिळनाडूतून ८५ कोटी व अरूणाचल प्रदेशातून अडीच कोटी रूपये जमा झाल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र, पश्‍चिम बंगालमधील निधीचे आकडे त्यांनी सांगितले नाहीत. मात्र भाजपने ज्यांचे सरकार पाडण्यासाठी सारा जोर लावला आहे त्या ममता बॅनर्जींच्या प. बंगाल सरकारकडून निधी संकलनात कोणतेही अडथळे आले नसल्याचे राय यांनी स्पष्ट केले.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख