व्यंकय्या नायडू म्हणतात, "ज्यांना निलंबित केले त्याचा मला आनंद नाही !'' - Venkaiah Naidu says, "I am not happy with those who have been suspended!" | Politics Marathi News - Sarkarnama

व्यंकय्या नायडू म्हणतात, "ज्यांना निलंबित केले त्याचा मला आनंद नाही !''

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही विरोधकांवर टीका केली आहे.

नवी दिल्ली : कृषी विधेयकांवरून राज्यसभेत आज तिसऱ्या दिवशीही गोंधळ सुरूच असून ज्या आठ सदस्यांना निलंबित केले आहे. त्यांच्यावरील कार्यवाही मागे घ्या अशी मागणी राज्यसभेतील विरोधीपक्षनेते गुलामनबी आझाद यांनी केली आहे.

याच मुद्यावर आज विरोधकांनी सभात्याग करीत अधिवेशनावर बहिष्कार घातला. त्यानंतर निषेध आंदोलनास बसलेल्या खासदारांना पाठिंबा देण्यासाठी निघून गेले. 

कृषी विषयक विधेयक मंजुरीच्या वेळी राज्यसभेत गोंधळ घातल्या बद्दल आठ सदस्यांचे एका आठवड्यासाठी निलंबन करण्यात आले आहे. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक , शेतकऱ्यांना मूल्य आश्वासन (सुरक्षा) करार व कृषि सेवा विधेयक ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली होती. त्यावर राज्यसभेची मोहोर उमटली. या वेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत गोंधळ घातला होता. 

दरम्यान, ज्या आठ सदस्यांना निलंबित केले आहे. त्याबद्दल मला आनंद नाही. पण, त्यांचे सभागृहातील वागणे योग्य नव्हते. आम्ही सभागृहातील कोणत्याही सदस्याविरोधात नाही असे राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. 

तर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी काहीशी मवाळ भूमिका घेते विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना आवाहन करताना म्हटले आहे, की सभागृहाचे कामकाज चालले पाहिजे. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसले पाहिजे आणि चर्चा केली पाहिजे. तसेच सत्ताधारी पक्षानेही समजून घेतले पाहिजे. सभागृह चालवायचे असेल तर दोघांनी एकत्र यायला हवे असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनीही विरोधकांवर टीका केली आहे. ते म्हणाले, की ज्या सदस्यांना निलंबित केले आहे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली सरकार त्यांच्या निलंबनाविषयी विचार करेल. कोणालाही निलंबित करण्याची आमची इच्छा नाही. पण, सभागृहात जे काही झाले ते योग्य नव्हते. आम्ही चर्चा करायला तयार आहोत असेही ते म्हणाले. 

अध्यक्षांसमोरील हौद्यात जाऊन सदस्यांनी विधेयकाविरोधात घोषणा दिल्या. अखेर या गोंधळातच आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर करुन घेण्यात सरकारला यश आले. डेरेक ओ ब्रायन, संजय सिंग, राजीव सातव, के. के. रागेश, रिपून बोरा, डोला सेन, सैयद नाझीर हुसेन व एलामारन करी अशी या सदस्यांची नांवे आहेत. ज्यांना निलंबित केले आहे त्यांनी संसद भवनातील गांधी पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख