आधी मुख्यमंत्री क्वारंटाइन अन् आता मंत्रालये बंद

कॅबिनेट मंत्री पॉझिटिव्ह आढळल्यानंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि इतर तीन मंत्र्यांना क्वारंटाइन व्हावे लागले होते. आता राज्याची काही मंत्रालये आणि मुख्यमंत्री कार्यालय तीन दिवस बंद करावे लागले आहे.
uttarakhand cm office in secretariat building closed after minister found positive
uttarakhand cm office in secretariat building closed after minister found positive

डेहराडून : उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सत्पाल महाराज हे कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने त्यांच्या संपर्कात आल्यामुळे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि इतर तीन मंत्र्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. आता मुख्यमंत्री कार्यालयासह काही मंत्रालये तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

याविषयी बोलताना राज्य सरकारचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री मदन कौशिक म्हणाले की, मुख्यमंत्री कार्यालय तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचबरोबर पर्यटन, जलसंपदा हे विभागही तीन दिवस बंद करण्यात येतील. सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हे पाऊल उचलले आहे. 

सत्पाल महाराज, त्यांची पत्नी आणि कुटुंबातील सदस्य, कर्मचारी आणि कार्यकर्ते असे एकूण 21 जण रविवारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. सत्पाल महाराज हे शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित मंत्री आणि अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या नियमवलीनुसार स्वत:चे विलगीकरण करण्याची गरज नाही. कारण ते सत्पाल महाराज यांच्या अगदी जवळ गेलेले नव्हते. ते सामान्यपणे काम करु शकतात. त्यांना क्वारंटाइन करण्याची कोणतीही गरज नाही. 

मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि हरकसिंह रावत, मदन कौशिक आणि सुबोध यांनी मात्र स्वत: क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ते पुढील काही दिवस स्वत: क्वारंटाइन होतील आणि याच काळात त्यांची कोरोना चाचणी घेतली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली. 

देशात सुमारे दोन लाख रुग्ण 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये कोरोनाचे सध्या 730 रुग्ण आहेत आणि 222 जण उपचार घेऊन बरे झालेले आहेत. याचबरोबर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 8 हजार 171 रुग्ण सापडले असून, 204 जणांचा बळी गेला आहे. यामुळे देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 98 हजार 706 वर पोचली आहे.  

देशात कोरोनाचे सामूहिक संक्रमण सुरू

देशात कोरोनाचे सामूहिक संक्रमण सुरू झाले आहे, असे देशातील काही आघाडीच्या वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. या टप्प्यात कोरोनाचा अतियश वेगाने फैलाव होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सरकारकडून कोरोनाच्या सामूहिक संक्रमणाचा वारंवार इन्कार केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी सरकारचे कान टोचले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com