uttarakhand chief minster and three colleagues in self quarantine | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

मंत्रीच पॉझिटिव्ह निघाला; 'या' राज्यात मुख्यमंत्री क्वारंटाइन

वृत्तसंस्था
सोमवार, 1 जून 2020

उत्तराखंडचे पर्यटनमंत्री कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कात आल्याने मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील तीन सहकाऱ्यांवर क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. 

डेहराडून : उत्तराखंडचे पर्यटनमंत्री सत्पाल महाराज यांच्या कोरोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि इतर तीन मंत्र्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांची लवकरच कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या सर्वांच्या कोरोना चाचणीच्या अहवालाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. 

सत्पाल महाराज, त्यांची पत्नी आणि कुटुंबातील सदस्य, कर्मचारी आणि कार्यकर्ते असे एकूण 21 जण रविवारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. सत्पाल महाराज हे शनिवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित मंत्री आणि अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या नियमवलीनुसार स्वत:चे विलगीकरण करण्याची गरज नाही. कारण ते सत्पाल महाराज यांच्या अगदी जवळ गेलेले नव्हते. ते सामान्यपणे काम करु शकतात. त्यांना क्वारंटाइन करण्याची कोणतीही गरज नाही. 

मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि हरकसिंह रावत, मदन कौशिक आणि सुबोध यांनी मात्र स्वत: क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ते पुढील काही दिवस स्वत: क्वारंटाइन होतील आणि याच काळात त्यांची कोरोना चाचणी घेतली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली. 

केजरीवाल सरकार करणार दिल्लीच्या सीमा बंद 

नवी दिल्ली : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, यामुळे सरकारने राज्याच्या सीमा पुढील एका आठवड्यासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. केवळ अत्यावश्यक सेवांसाठी राज्यात प्रवेश मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. केजरीवाल म्हणाले की, दिल्लीच्या सीमा पुढील आठवडाभर बंद राहतील. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत. नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन त्यापुढील आठवड्यात सीमी पुन्हा खुल्या करण्याचा निर्णय घेण्यात येईल. आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्यांपैकी सलून उघडण्यात येतील मात्र, स्पा बंद राहतील. पार्किंगची समविषम नियमानुसार रस्ताच्या बाजूची दुकाने उघडण्यात येतील. केंद्र सरकारने दुकांनाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने सर्व दुकानांना उघडण्यास परवानगी दिली जाईल. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख